स्टाइलिश लूक्स, परफॉर्मन्स ओरिएन्टेड फिल्म्स, स्टँडअप कॉमेडी यांसारख्या अनेक कारणानं सई २०१८ मध्ये सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत होती. पण आता सई ताम्हणकरनं सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहण्याचा म्हणजेच ‘डिजीटल डिटॉक्स’चा पर्याय स्वीकारला आहे.

“ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबूक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी नेहमीच सक्रीय असते. मला माझ्या चाहत्यांशी संवाद साधायला फार आवडतो. पण या धावपळीच्या जगात काही वेळ स्वत:साठी मिळावा म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचा निर्णय घेतला आहे. मला स्वत:ला वेळ द्यायचाय. स्वत:मध्ये काही चांगले बदल घडवून आणायचे आहेत म्हणून मी डिजीटल डिटॉक्स करण्याचं ठरवलं आहे.” असं सई म्हणाली.
सई ताम्हणकरचे सोशल मिडीयावर लाखो चाहते आहेत. सध्या सईचे इंस्टाग्रामवर साडे नऊ लाखापेक्षा जास्त, ट्विटरवर ७९ हजारांपेक्षा जास्त फोलोअर्स आहेत शिवाय १० लाखापेक्षा जास्त फोलोअर्स फेसबुकवर आहेत. अशावेळेस सई अचानक डिजीटल डिटॉक्स करण्याचा विचार करतेय.

एकीकडे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपले फॉलोअर्स सर्वाधिक कसे वाढतील या प्रयत्नात असतात पण सईनं यासर्वांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जेव्हा केव्हा सई सोशल मीडियावर परतेल तेव्हा नवी सरप्राइजेस घेऊन येणार का? ह्याची आता तिचे चाहते वाट पाहत आहेत.