बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री सई ताम्हणकर ही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे. तिच्या अदा व बोल्ड अवतार यावर सगळेच जण फिदा असतात. तिने दर्जेदार अभिनयासोबतच आपल्या मधुर आवाजाने देखील चाहत्यांना मदहोश केले आहे. नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१९’ या सोहळ्यात पुन्हा एकदा सईच्या गाण्याची जादू पाहायला मिळाली. यावेळी तिने ‘शिट्टी वाजली’ हे गाणे गाऊन दाखवले. खरं तर तिला एका पोलिसाने हे गाणे गाण्यास सांगितले होते. आणि तिने त्या पोलिसाच्या धाकाने गाणे गायले. सईचे गाणे ऐकून प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.

‘झी टॉकीज’ ही मराठी चित्रपट वाहिनी दरवर्षी ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा सोहळा आयोजित करते. यंदाचे वर्ष सुद्धा याला अपवाद नव्हते. सई ताम्हणकरने गायलेले ‘शिट्टी वाजली’ हे गाणे यंदाच्या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले.

अभिनेता सागर कारंडे याने पोलिसाच्या भूमिकेत स्टेजवर एंट्री घेतली. एवढेच नाही, तर सागरने थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन उपस्थित कलाकारांना आपली पोलिसी खाक्या दाखवला. सईने या पोलिसाचा धाक घेतल्याचे सगळ्यांनाच पाहायला मिळाले. अर्थात, तिने सादर केलेले गाणे हा सगळ्यांच्या मनोरंजनाचा मोठा विषय ठरला.