मला सख्खा भाऊ नाहीये. पण मी दरवर्षी सचिन गुरवला राखी बांधते. खरंतर आम्ही दोघही एकमेकांना राखी बांधतो. आमची ओळख चित्रपटसृष्टीतचं झाली. तेव्हापासून आमची चांगली मैत्री झाली.

माझ्या आई-वडिलांची मी एकुलती एक मुलगी आहे. पण मला कधीच भावंडांची कमतरता जाणवली नाही. मी एकटीचं असल्यामुळे माझे लहानपणापासून खूप लाड व्हायचे. त्यामुळे आपल्यावरचं प्रेम कोणाशी शेअर केलं जाऊ नये असचं मला वाटायचं. पण सचिन मला सख्ख्या भावासारखाचं आहे. जरी मला सख्खा भाऊ असता तर तो सचिनसारखाचं असला असता हे मी सांगू शकते. मी मूळची सांगलीची तर तो कोल्हापूरचा आहे. माझं पहिल नाटक मी कोल्हापूरात केलं होत. आमची गावं जवळपास असल्याने मला त्याच्याबाबत आणखीनच आपलेपणा वाटतो. आम्ही दोघंही आता कामानिमित्त बाहेर आहोत. त्यामुळे रक्षाबंधन दिनी जर आम्हाला भेटता आलं तर दरवर्षीप्रमाणे आम्ही एकमेकांना राखी बांधू. भेटवस्तूचं म्हणाल तर मी त्याच्याकडे काहीही मागते. त्याच्याकडे छान मोबाइलचं कव्हर असेल आणि मला ते आवडलं तर लगेच तो मला लगेचच ते कव्हर देतो. आमच्यासाठी छोट्या छोट्या भेटवस्तूदेखील खूप महत्त्वाच्या असतात. त्याची बायको समता आणि माझी खूप चांगली मैत्री असल्याने आमचं जणू एक कुटुंबच तयार झालं आहे.

नुकताचं सईचा वाय झेड हा चित्रपट येऊन गेला. सईच्या इतर चित्रपटांप्रमाणेच यातही तिचा हटके लूक पाहावयास मिळतो. नेहमी आपल्या बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध असणारी सई यात मात्र साध्या मुलीच्या भूमिकेत दिसते.

शब्दांकन- चैताली गुरव