News Flash

सई ताम्हणकर प्रथमच ग्रामीण ढंगात

सई ताम्हणकरचे नाव घेताच तिने साकारलेल्या शहरी, आधुनिक मुलीच्या ‘बोल्ड अँड ब्युटिफुल’ व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर येतात.

| March 5, 2015 07:45 am

सई ताम्हणकरचे नाव घेताच तिने साकारलेल्या शहरी, आधुनिक मुलीच्या ‘बोल्ड अँड ब्युटिफुल’ व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर येतात. ‘दुनियादारी’मधील सत्तरीच्या दशकातील शिरीन असो किंवा ‘क्लासमेट’मधील कॉलेजमधली बेधडक मुलगी अपू.. तिच्या तोंडी कायम शहरी भाषा ऐकू आली. पण लवकरच सई एका कुंभार मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानिमित्ताने प्रथमच सईचे गावरान ठसकेबाज रूप पाहायला मिळणार आहे.

सध्या ‘सई ताम्हणकर म्हणजे हिट चित्रपट’ असे समीकरण मराठीत आहे. तिने साकारलेल्या बहुतांशी भूमिका शहरी होत्या. त्यातही कित्येकदा तिच्यावर इंग्रजाळलेल्या मराठीचा प्रभाव जाणवत असल्याची टीकाही झाली. पण त्यावरही आपण वेळोवेळी काम केल्याचे सई सांगते.
पण मूळची सांगलीची असलेल्या सईला आतापर्यंत ग्रामीण भागातील व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली नव्हती. ती संधी तिला अभिनेते गिरीश कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट ‘जाऊ द्या ना बाबासाहेब’मध्ये मिळणार आहे. या चित्रपटामध्ये सई करिश्मा कुंभार नामक एका कुंभारणीची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी ती सध्या मडकी बनविण्याचे प्रशिक्षणही घेत असल्याचे तिने सांगितले. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी सईच्या तोंडी विशिष्ट प्रकारच्या ग्रामीण बोलीतील संवाद आहेत. पण तो हेल.. बोली याबाबत सईने मौन पत्करले आहे.
मुंबईत आल्यावर सईला तिच्या सांगलीच्या मराठी लकबीवर बरेच काम करावे लागले होते. ‘उभारलेय’ असे खास सांगलीच्या बोलीभाषेतील शब्द, बोलताना सतत ‘की’ शब्दाचा वापर टाळणे.. असे बदल तिला करावे लागले होते. मराठी चित्रपटांमध्ये रुळलेली मुंबई-पुणे लकबीची मराठी भाषा शिकण्यासाठी तिने अभ्यासही केला होता. मात्र आता या चित्रपटाच्या निमित्ताने तिला प्रथमच पडद्यावर ग्रामीण मुलगी साकारण्याची संधी मिळत आहे. आपल्या प्रतिमेच्या चौकटीबाहेरची ही भूमिका सई कशी साकारते? याबाबत आता उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 7:45 am

Web Title: sai tamhankar will play rural girl in upcoming movie
Next Stories
1 चौदा वर्षांनी गोविंदा छोटय़ा पडद्यावर !
2 ईटीव्ही मराठी ‘कलर्स’ होणार
3 प्रश्नांची उत्तरे द्या आणि घुमानला चला!
Just Now!
X