लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरने ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला या पहिल्यावहिल्याच चित्रपटाने लोकप्रियता मिळवून दिली. आता सई लवकरच एका तेलुगू चित्रपटात झळकणार असल्याचे समोर आले आहे.

सई ‘मेजर’ या तेलुगू चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट तेलुगू आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाविषयी बोलताना सई म्हणाली, ‘माझ्यासाठी चित्रपटाची कथा ही फार महत्त्वाची आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यातील पात्र मला आवडले. मला चित्रपटाची ऑफर येताच मी चित्रपटाला होकार कळवला. मी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यासाठी तयार आहे आणि हा चित्रपट हिंदीमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे. आता मी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होण्याची वाट पाहत आहे.’

ऑक्टोबर महिन्यात चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी सई हैद्राबादला जाणार आहे. चित्रपटाचे अर्धे शुटींग पूर्ण झाले आहे.