23 February 2019

News Flash

‘सिम्बा’नंतर साराच्या पदरात पडला आणखी एक चित्रपट!

'सिंबा' हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टारकिड्स चंदेरी दुनियेत पदार्पण करण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान या दोघीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. जान्हवी कपूरचा ‘धडक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून साराचा ‘केदारनाथ’ हा चित्रपटही २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाव्यतिरिक्त तिच्याकडे ‘सिंबा’ हा चित्रपट असून आणखी एक चित्रपट तिच्या पदरात पडल्याचं सांगण्यात येत आहे.

‘डीएनए’च्या माहितीनुसार, साराकडे सध्या ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ हे दोन चित्रपट आहेत. त्यातच तिला आता आणखी एका नव्या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ती वडील सैफ अली खानबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असल्यामुळे सारा-सैफ या बार-लेकीच्या जोडीला विचारणा करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

या चित्रपटातील मुलीच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक नितीन कक्कड यांनी साराला पसंती दिली असून त्यांनी सारा आणि सैफला याविषयी विचारले होते. चित्रपटाची कथा दोघा बापलेकीला पसंत पडल्यामुळे त्यांनी चित्रपटासाठी होकार दिला आहे. मात्र, या चित्रपटाची तारीख आणि नाव अद्याप स्पष्ट झाले नसून लवकरच ही घोषणा करण्यात येईल.

वाचा : ‘अब तक ५६’च्या पटकथा लेखकाची आत्महत्या

दरम्यान, कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वीच साराच्या पदरात उत्तम कथा असलेले चित्रपट पडत असल्यामुळे तिच्या करिअरचा आलेख आतापासूनच उंचावायला लागला आहे असं एकंदरीतच दिसून येत आहे. साराची प्रमुख भूमिका असलेला ‘केदारनाथ’ हा चित्रपट येत्या २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून ‘सिम्बा’ हा चित्रपट २८ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

First Published on July 12, 2018 9:13 am

Web Title: saif ali khan and sara to play reel father daughter role in movie together