मैदानाच्या वापराबाबत पूर्वपरवानगी नाही

करार न करताच फुटबॉल असोसिएशनला देण्यात आलेल्या परळ येथील सेंट झेविअर्स मैदान वादाच्या भोवऱ्यात अडकले असतानाच पूर्वपरवानगी न घेताच या मैदानात सुरू असलेले प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या चित्रपटाचे चित्रीकरण पालिकेने शुक्रवारी रोखले. इतकेच नव्हे तर चित्रीकरणासाठी आणण्यात आलेले साहित्यही पालिकेने जप्त केले. दंडात्मक कारवाई करून हे साहित्य परत देण्यात येणार असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

एका खासगी इमारतीमध्ये सैफ अली खान याच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. जवळच्याच सेंट झेविअर्स मैदानातही चित्रीकरण सुरू होते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर साहित्यही आणण्यात आले होते. मात्र मैदानात चित्रीकरण करण्यासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पालिकेच्या एफ-उत्तर विभाग कार्यालयाने मैदानात जाऊन चित्रीकरण रोखले. तसेच मैदानात ठेवण्यात आलेले साहित्यही जप्त केले, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

चित्रपटनिर्मिती करणाऱ्या संस्थेने पालिकेकडे परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केला नव्हता. याबाबत आपल्याला कल्पना नव्हती असे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेशी संपर्क साधला असून चित्रीकरणासाठी परवानगी मिळावी यासाठी ही संस्था पालिकेकडे अर्ज करणार आहे. त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. पालिकेकडे रीतसर अर्ज करून चित्रीकरणासाठी परवानगी घेतली जाईल, असे चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या संस्थेकडून सांगण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.