वयाच्या ३४ व्या वर्षी आपलं जीवन संपवणाऱ्या सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. सदैव हसतमुख असणारा हा अभिनेता असा टोकाचा निर्णय घेईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचं वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. यात अभिनेत्री सारा अली खानलादेखील हा धक्का सहन होत नसून तिची सध्याची स्थिती तिचे वडील, अभिनेता सैफ अली खान यांनी एका मुलाखतीत सांगितली.

‘इंडिया टीव्ही’नुसार, साराने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटाच्या निमित्ताने तिला पहिल्यांदाच सुशांत सिंह राजपूतसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सुशांतच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर सारा सुन्न झाल्याचं पाहायला मिळालं. तिने सोशल मीडियावरदेखील केवळ सुशांतचा फोटो शेअर करत त्यावर काही इमोजी शेअर केले होते. यावरुन ती स्तब्ध झाल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर सध्या तिचं घरातलं वागणंही बदलल्याचं सैफने सांगितलं आहे.

“मी याविषयी बोललो तर साराला आवडले की नाही हे माहित नाही, पण एक सांगावसं वाटतं. सारा प्रचंड दु:खी आहे. केवळ दु:खीच नाही, तर तिला फार मोठा धक्का बसला आहे. साराला सुशांत एक अभिनेता म्हणून कायम आवडायचा. त्याच्या स्वभावातील काही गुण तिला आवडायचे. सुशांत प्रचंड बुद्धिमान असल्याचं तिने मला सांगितलं होतं. तो फिलॉसॉफी, इंजिनिअरिंग अशा विविध विषय़ांवर चर्चा करायचा. त्यामुळे अजूनही ती या धक्क्यातून सावरली नाही”,असं सैफने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “तिला सुशांतच्या स्वभावातील विविध पैलू आवडत होते. आणि हे मला सतत जाणवतही होतं. मी जेव्हा त्याच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटात कॅमियो केला होता, तेव्हाही मला त्याच्या स्वभावातील चांगुलपणा जाणवला होता”.

दरम्यान, १४ जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून कलाविश्वात सध्या विविध चर्चांना उधाण आलं आहे. अनेकांच्या मते, कलाविश्वातील सुशांतसोबत काही अशा घटना घडल्या ज्यामुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.