दिलजीत दोसांझनंतर आता सैफ अली खान व श्रेया घोषाल यांनाही इशारा

FWICE (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) या संस्थेने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान व गायिका श्रेया घोषाल यांना पाकिस्तानी आयोजकांसाठी काम न करण्याचा इशारा दिला आहे. जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करुन त्यांनी कामे स्विकारली, तर कार्यक्रम ज्या देशात असेल त्या देशातील त्यांचा व्हिसा तक्ताळ रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी असाच काहीसा इशारा पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याला देण्यात आला होता.

दिलजीतचे प्रकरण काय होते?

त्याने रेहान सिद्दीकी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात काम करण्यास होकार दिला होता. हा कार्यक्रम अमेरिकेत होणार होता. मात्र रेहान सिद्दीकी मुळचे पाकिस्तानी असल्यामुळे FWICE ने दिलजीतच्या या कार्यक्रमास विरोध केला होता. तसेच हा विरोध डावलून जर त्याने कार्यक्रम केला, तर त्याचा अमेरिकेचा व्हिसा रद्द करण्यात येईल असा इशारा दिला होता. या नंतर दिलजीतने त्या कार्यक्रमात गाणे गाण्यास नकार दिला होता.

तसेच “मला FWICEने दिलेल्या इशाऱ्या बद्दल माहित नव्हते. माझा करार बालाजी एंटरटेन्मेंट कंपनी सोबत होता. कोणत्याही पाकिस्तानी नागरीकासाठी काम करणे हा माझा निर्णय नव्हता. परंतु जर माझ्या या कृतीमुळे जर देशाचा अपमान झाला असेल तर मी सर्वांची माफी मागतो. माझे माझ्या देशावर प्रेम आहे.” अशा शब्दात दिलजीतने माफी देखील मागितली होती.

FWICE ही संस्था काय करते?

FWICE ही भारतातील चित्रपट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची संघटना आहे. या संघटनेचे मुख्य कार्यालय मुंबईत असुन तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक लोक या संघटनेचे सदस्य आहेत.