15 November 2019

News Flash

बाबांनी मला ‘पद्मश्री’ परत करण्यापासून रोखलं- सैफ अली खान

सैफने पद्मश्री पुरस्कार विकत घेतला अशी टीकासुद्धा सोशल मीडियावर झाली होती.

सैफ अली खान आणि त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी

अभिनेता सैफ अली खानला कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल २०१० मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यानंतर झालेल्या हॉटेल मारहाण प्रकरणामुळे सैफला देण्यात आलेल्या पुरस्कारावरून वादंग निर्माण झाला होता. या संपूर्ण प्रकरणावर आणि सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगवर सैफने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला पुरस्कार स्वीकारायचा नव्हता,’ असं सैफने अभिनेता अरबाज खानच्या चॅट शोमध्ये सांगितलं.

सैफने पद्मश्री पुरस्कार विकत घेतला अशी टीकासुद्धा सोशल मीडियावर झाली होती. या ट्रोल्सना उत्तर देताना तो म्हणाला, ‘पद्मश्री पुरस्कार हा विकत घेतला जाऊ शकतो का? भारत सरकारला लाच देऊन हा सन्मान विकत घेण्याइतकी माझी कुवत नाही. मला वाटतं मी पद्मश्री पुरस्कार स्वीकारायला नको होता. चित्रपटसृष्टीत माझ्यापेक्षा अनेक ज्येष्ठ अभिनेते आहेत, ज्यांना हा पुरस्कार मिळाला नाही. पण माझ्यापेक्षाही कमी पात्र असलेल्यांनाही हा पुरस्कार मिळाल्याची मला खंतही वाटते.’

वडिलांच्या आग्रहाखातर पुरस्कार स्वीकारल्याचं सैफने स्पष्ट केलं. ‘मला पुरस्कार परत करायचा होता. पण भारत सरकारने दिलेला सन्मान नाकारण्याइतपत स्थान तू अजून मिळवलं नाहीस असं वडिलांनी म्हटलं होतं. त्यामुळे मी तो पुरस्कार आनंदाने स्वीकारला,’ असं तो म्हणाला.

सैफ अली खानला २०१० मध्ये तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यावर्षी अभिनेत्री रेखा, बॉक्सर विजेंदर सिंग यांनाही पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. मात्र सैफ अली खानच्या पद्मश्री पुरस्कारावर अनेकांनी आक्षेप घेतला होता.

First Published on May 14, 2019 7:32 pm

Web Title: saif ali khan slams a troll claiming that he bought his padma shri award