नेटफ्लिक्सवरची सर्वात गाजलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’च्या मार्गातील अडचणी दूर झाल्या आहेत. या सीरिजच्या दुसऱ्या सिझनच्या चित्रीकरणाला अखेर मुंबईत सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सैफ या सीरिजच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तुर्त तरी सैफवर आधारित दृश्य मुंबईत चित्रीत करण्यात येत आहे. त्यानंतर इतर कलाकारांसोबत चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे.

विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर आधारित ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीनं साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रेक्षकांनी उचलून धरली. ‘कभी कभी लगता है अपुनीच भगवान है’ म्हणणाऱ्या गणेश गायतोंडेचे यासारखे अनेक संवाद सोशल मीडियावर हिट ठरले. शिवीगाळ, खून मारामारी, अश्लिल संवाद आणि दृश्यानं भरलेली ही वेब सीरिज जितकी वादाच्या भोवऱ्यात सापडली तितकीच ती प्रसिद्धही झाली होती.

 

या सीरिजचा दुसरा सिझन दिवाळीत येणं अपेक्षीत होतं. मात्र पहिला सिझन वादात सापडल्यानं दुसऱ्या सिझनच्या भविष्यावर अनिश्चिततेची टांगती तलवार होती. पण, आता सैफ अली खानपासून सेक्रेड गेम्सच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे दुसरा सिझन लवकरच येणार हे निश्चित झालं आहे. मी टु मोहिमेचा फटका सेक्रेड गेम्सलाही बसाला होता.

दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे फँटम फिल्म ही कंपनी बंद करण्याचा निर्णय दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानीनं घेतला. हे तिघंही ‘फँटम फिल्म’ बॅनर अंतर्गत काम करत होते. विक्रमादित्य आणि अनुरागनं सेक्रेड गेम्स च्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन केलं होतं. त्यामुळे विकास बहलसोबत भागीदारी असल्यानं विक्रमादित्य आणि अनुरागसोबत काम करावं की नाही याचा विचार नेटफ्लिक्स कंपनी करत होती. तर दुसरीकडे या सीरिजचा लेखक वरूण ग्रोवरवर देखील लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप होते.

या तिघांची स्वतंत्र चौकशी नेटफ्लिक्सनं केली. यातून समाधानकारक उत्तर मिळाल्यानंतरच सेक्रेड गेम्सचा दुसरा सिझन तयार करण्यास नेटफ्लिक्सनं होकार दिला. दिवाळी झाल्यानंतर इतर कलाकारांसोबत चित्रीकरणाला सुरवात होणार आहे.