बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा आगामी ‘लाल कप्तान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सैफ नागा साधूंच्या रुपात दिसणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं. तेव्हापासून सैफच्या लूकची चर्चा सुरु आहे. सैफच्या या लूकची तुलना हॉलिवूड चित्रपट ‘पायरेट्स ऑफ कॅरेबियन’मधील ‘जॅक स्पॅरो’ या भूमिकेशी करण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये जॅक स्पॅरो ही भूमिका अभिनेता जॉनी डेप यांनी वठविलेली होती. मात्र सैफच्या आणि जॉनी डेप यांच्या लूकमधील साम्यतेविषयीच्या चर्चांवर ‘लाल कप्तान’च्या दिग्दर्शकांनी मौन सोडलं आहे.

‘चित्रपटातील भूमिकेची गरज म्हणून काही भागांच्या चित्रीकरणासाठी सैफच्या कपाळावर वस्त्र गुंडाळण्यात आलं होतं. मात्र काही नोटीस आल्यानंतर आमच्या क्रिएटीव्ह टीमने पोस्टरमध्ये महत्वाचे बदल केले’, असं दिग्दर्शकांनी सांगितलं.

पुढे ते म्हणतात, ‘खरं तर नागा साधू जवळपास ५ हजार वर्षांपासून कपाळावर वस्त्र गुंडाळतात. त्यामुळे कदाचित जॅक स्पॅरो या व्यक्तीरेखीची संकल्पनादेखील नागा साधूंना प्रेरित होऊन घेतली असेल’.

दरम्यान, ‘लाल कप्तान’मध्ये सैफ नागा साधूच्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्या व्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हा, दीपक डोबरियाल, मानव विज आणि झोया हुसैन ही कलाकारमंडळी झळकणार आहेत. ‘लाल कप्तान’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवदीप सिंग करत आहेत. तसेच या चित्रपटाची संपूर्ण कथा नागा साधू यांचा जीवनाभोवती फिरताना पाहायला मिळणार आहे. चित्रपटातील सैफची भूमिका ही त्याच्या आता पर्यंतच्या करिअरमधील आव्हानात्मक भूमिका असणार आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.