‘रंगून’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता अवघ्या या काही दिवसांवरच आली आहे. प्रेक्षांसमोर हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच काही खास पाहुण्यांसाठी या चित्रपटाचे स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला काही बी टाऊन सेलिब्रिटींसोबतच बेगम करिना कपूरनेही हजेरी लावली होती. यावेळी चित्रपटातील सैफचे काम पाहून करिनाने त्याच्या कामाची प्रशंसा केली आहे. करिना आणि सैफ सहसा एकमेकांच्या चित्रपटांबद्दल बोलताना दिसत नाहीत. पण, यावेळी मात्र ती सैफचे कौतुक करताना दिसली. सैफ अली खान ज्यावेळी नकारात्मक छटा असणाऱ्या व्यक्तिरेखा साकारतो तेव्हा त्याच्या या भूमिका करिनाला फारच भावतात असे वृच्च द क्वींटने प्रसिद्ध केले आहे.
‘या चित्रपटामध्ये सैफ पहिल्यांदाच एका पारसी चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत दिसत आहे. विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करतात. या चित्रपटामध्ये तीन कलाकार तुमचे लक्ष वेधतात. ते म्हणजे सैफ, शाहिद आणि कंगना’, असे करिना म्हणाली. यावेळी करिनाने या कलाकारांमध्ये असलेल्या स्पर्धेविषयीही तिचे मत मांडले. ‘मला त्यांच्यातील स्पर्धा फार आवडली. आणि ही अशी स्पर्धा काही बाबतीत महत्त्वाचीही आहे कारण तेव्हाच हे कलाकार त्यांचे सर्वस्व पणला लावतात. सैफ, शाहिद, कंगना हे तिघंही चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकार आहेत’, असे करिना म्हणाली.
या चित्रपटातील सैफच्या भूमिकेविषयी सांगताना करिना म्हणाली, ‘त्याची (सैफची) या चित्रपटातील भूमिका लक्षात राहण्याजोगी आहे. कारण, तो पहिल्यांदाच अशा कोणत्यातरी भूमिकेत दिसत आहे. आम्ही या चित्रपटासाठी फारच उत्साही आहोत’. यावेळी करिनाने चित्रपटाचे, चित्रपट दिग्दर्शकांचेही तोंड भरुन कौतुक केले. ‘हा चित्रपट यंदा प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटातील एक उत्तम चित्रपट ठरु शकतो. हा चित्रपट उत्तम असण्याचे कारण तो माझ्या आवडत्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केला आहे हेसुद्धा असू शकते. ‘ओमकारा’चेही दिग्दर्शन त्यांनीच (विशाल भारद्वाज यांनीच) केले होते. या चित्रपटातून प्रेक्षकांनीही सैफबद्दल काही अपेक्षा ठेवणे सहाजिकच आहे कारण, त्याने ‘ओमकारा’मध्ये साकारलेल्या ‘लंगडा त्यागी’ या भूमिकेलाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती’, असे म्हणत करिनाने सैफच्या कामाचे कौतुक केले आहे.
वाचा: क्वीन-नवाबसह ‘रंगून’ गेला ‘कॉफी विथ…’चा खास भाग
करिना कपूर, सैफ अली खान आणि शाहिक कपूर यांच्यामध्ये असणारं नातं सर्वांसमोरच उघड आहे. पण, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरत या कलाकारांनी एका नव्या, मैत्रीच्या नात्याला सुरुवात केली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. २४ फेब्रुवारीला शाहिद कपूर, सैफ अली खान आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘रंगून’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून विशाल भारद्वाज यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सध्या या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांची दाद मिळवत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2017 4:43 pm