दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानू यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्या अनेक चाचण्या आणि तपासण्या करण्यात आल्या आहेत. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. परंतू, आता समोर येत असलेल्या ताज्या माहितीनुसार, सायरा बानू यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आणि स्थिर आहे. लवकरच त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येतंय. सायरा बानूच्या कुटुंबातील विशेष मित्र फैजल फारुकी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

फैजल फारुकी हे गेल्या काही महिन्यांपासून सायरा बानू आणि दिलीप कुमार यांचे प्रवक्ते म्हणून काम करत आहेत. नुकतंच त्यांनी सायरा बानू यांची हेल्थ अपडेट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिलंय की, “काळजी करण्याची गरज नाही. देवाचा आशीर्वाद सोबत आहे. त्यांना मुंबईच्या खार इथे असलेल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.” त्यांना छातीत दुखू लागलं होतं. पण आता त्यांची प्रकृती ठीक आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. करोना महामारीमुळे सर्व खबरदारी घेतली जात आहे.” दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानू खूप दु: खी झाल्या आहेत आणि त्या फार तणावात असल्याचं देखील फैजल फारुकी यांनी सांगितलं.

आणखी वाचा: सायरा बानो यांनी चार दिवसांपूर्वीच धर्मेंद्र यांना केला होता कॉल; म्हणाल्या…

यापुढे फैजल फारुकी म्हणाले, “दिलीप साहबच्या निधनानंतर त्यांच्यावर खूप तणाव होता. यामुळे त्यांची प्रकृती खालावली. सध्या ते आयसीयूमध्ये आहेत. पण त्यांची प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, अनेक चाचण्या देखील केल्या आहेत.” सायरा बानू यांना हृदयविकाराचा झटका असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना फैजल फारुकी म्हणाले, “सायरा बानू यांना कोणताही हृदयविकाराचा झटका आलेला नाही. फक्त त्यांच्या छातीत दुखत होतं. लोक काहीही बोलत असले तरी मी सत्य परिस्थिती सांगत आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची करोना चाचणी देखील निगेटीव्ह आलेली आहे. सध्या त्या आराम करत आहेत.”

सायरा बानू यांचे पती दिलीप कुमार यांचं ७ जुलै रोजी निधन झालं. पती दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. पतीच्या जाण्याने त्यांच्या आयुष्यात एकटेपणा आला आहे. पती दिलीप कुमार यांनाच त्या आपलं संपूर्ण जग मानत होत्या. तेव्हापासून त्या कुणाशी जास्त बोलत नाहीत आणि कुणाला भेटत सुद्धा नाहीत. एकटेपणा आणि तणावामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचं देखील सांगण्यात येतंय.