अभिनय क्षेत्राच्या पदार्पणातच मोठं यश संपादन करणारी ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आगामी ‘कागर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या ‘व्हॅलेंटाइन डे’ रोजी म्हणजेच १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता प्रेक्षकांना रिंकूच्या या चित्रपटाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी ‘कागर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांचे ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ‘कागर’च्या निमित्ताने मकरंद आणि रिंकू पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या ‘उदाहरणार्थ’ या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. मकरंद यांच्या ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या दोन भिन्न विषयांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. त्यामुळे ‘कागर’विषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे.

फेब्रुवारीमध्ये रिंकूची बारावीची परीक्षा असल्याने चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असं निर्माते विकास हांडे आणि सुधार कोलते यांनी स्पष्ट केलं. मला स्वतःला कागर विषयी प्रचंड उत्सुकता आहे. पण बारावीची परीक्षा असल्याने मला अभ्यासाला वेळ देणे आवश्यक आहे. निर्मात्यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि १४ फेब्रुवारीला चित्रपट प्रदर्शित करायचा नाही असं ठरवलं. चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं असलं, तरी लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल,’ असं रिंकूनं सांगितलं आहे.

रिंकूने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून पदार्पण केलं. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. आता दोन वर्षांनी तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.