२०१६ हे वर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी फार महत्त्वाचे वर्ष ठरले. ‘सैराट’ या एका चित्रपटाच्या प्रदर्शनाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित करण्यात आले. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने महाराष्ट्रातीलच नाही तर परदेशातील प्रेक्षकांनाही याडं लावलं. ‘सैराट’मुळे रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर हे दोन नवे चेहरे चित्रपटसृष्टीला मिळाले.

या चित्रपटाची लोकप्रियता पाहता ‘सैराट’ चित्रपटाचा रिमेक कन्नड भाषेतही येणार असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वीच आली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण आता पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रिंकू राजगुरु दिसणार आहे. ‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेला ‘मनसु मल्लिगे’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. रिंकू यावर्षी १० वीत असल्यामुळे तिला अभ्यासासाठी पुरेसा वेळ हवा होता. त्यामुळेच निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. मात्र अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. चित्रपटाची तारीख जरी बदलली असली तरीही सध्या सैराटच्या या कन्नड व्हर्जनमधील झिंगाट या गाण्याने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. मराठीत अनेकांनाच या गाण्याने थिरकायला भाग पाडले होते. त्याचप्रमाणे झिंगाटचे हे कन्नड व्हर्जन सध्या सोशल मीडियावरही गाजत आहे. अनेकांना ही भाषा कळत नसली तरीही त्या गाण्याचा ठेका मात्र बऱ्याच जणांच्या पसंतीस उतरच आहे.

सध्या कन्नड भाषेतील सैराटची फार चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटांतील गाण्यांचे ऑडिओ लॉन्च करण्यात आले आहेत. अगदी कमी वेळात या गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. ‘मनसु मल्लिगे’ या चित्रपटाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश करणार आहे. यासंबंधीचे वृत्त द न्यू इंडियन एक्स्प्रेस या संकेतस्थळाने दिले आहे. दरम्यान, ‘सैराट’च्या दाक्षिणात्य भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत.