आर्ची आणि परश्याच्या प्रेमानं सराट झालेलं मन एकीकडे आणि चित्रपट संपताना सुन्न करणाऱ्या शांततेत रक्ताने माखलेली चिमुकली पावले कित्येक प्रेक्षकांच्या मनात आवाज न करता शिरली तेव्हापासून खरं तर ही मने सराटली आहेत. समाजमाध्यमांवर आणि पत्रांच्या माध्यमातून अनेकांनी हे सराटपण मोकळेपणानं कबूल केलं आहे. ‘फँड्री’च्या वेळी दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळेने समाजव्यवस्थेवर भिरकावलेला दगड कित्येक मनांना घायाळ करून गेला होता. पण त्यावेळीही जितकी चर्चा झाली नसेल त्यापेक्षा दुपटीने ‘सैराट’ पाहिल्यानंतर समाजमन ढवळून निघालं आहे.

या चित्रपटात जातीव्यवस्थेचा, समाजातील उतरंडीचा, जाती-धर्मापलीकडे फुललेल्या निष्पाप प्रेमाचा, प्रेमातून बाहेर पडल्यानंतरच्या वास्तवाचा आणि पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही काहीच बदललेलं नाही हे काळजात ठसवून देणारा असा जो जो दगड नागराजनं पेरलेला होता तो तो पार लोकांना जखमी करून गेला आहे. आणि त्यामुळेच सेलिब्रिटी कलाकारांपासून ते सामान्य माणसांपर्यंत प्रत्येकाने ‘सैराट’ पाहिल्यानंतरची अस्वस्थता या ना त्या माध्यमातून मोकळी केली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर समाजातून उमटलेल्या या विचार स्पंदनांचा आढावा घेतला तर अनेक गमतीजमती, आपल्यातच असलेला विरोधाभास किंवा दुटप्पीपणा सहज लक्षात येतो..

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

‘सैराट’नंतर दिग्दर्शकाचे कौतुक करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. कित्येक वर्षांनंतर जातीव्यवस्थेचं भयाण वास्तव नजरेसमोर आणून लोकांच्या मनात झणझणीत अंजन टाकणारी चित्रकृती केल्याबद्दल नागराज मंजुळे यांचं कौतुक कित्येकांनी केलं आहे. पण चित्रपटातून जातीपातीच्या व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या नागराजलाही समाजाने आपापल्या कुवतीप्रमाणे वाटून घेतलं आहे हे विशेष. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या चित्रपटांमधून शाळकरी वयातील मुलांना प्रेम करायला लावतात, हा नागराजवर घेतलेला पहिला आक्षेप होता. नागराजचा चित्रपट म्हणजे जातींमधल्या संघर्षांवर थेट भाष्य असणार हे एका वर्गाने मनाशी पक्कं करून घेतलं आहे. आणि म्हणून नागराजबद्दल पूर्वग्रह बाळगणाऱ्या या समाजाने त्याच्यासारख्या दिग्दर्शकाला कोणा एका जातीचं लेबल लावून त्याच्या प्रतिभेला नाकारण्याचा प्रयत्न करू नये, हेही तितक्याच निग्रहाने दुसरा वर्ग सांगतो आहे.

‘सैराट’चा शेवट हा फक्त शहरी प्रेक्षकवर्गासाठीच नाही तर ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठीही मोठा धक्का आहे हे कित्येक पत्रांवरून स्पष्ट झालं आहे. ग्रामीण भागात जातीव्यवस्थेचा, रूढी-परंपरांचा प्रभाव आहे. असे असतानाही तिथल्या प्रेक्षकांना याचा धक्का का बसावा? त्याचं कारण एका पत्रात सुरेखपणानं आलं आहे. अर्थात, पत्रलेखकाने याला चक्रव्यूह असं गोड नाव दिलं असलं तरी मुळात, आर्ची आणि परश्याबरोबर जे झालं ते चुकीचंच आहे याची जाणीव कोणत्याही गटातील माणसाला त्याच तीव्रतेने झाली आहे. ‘फँड्री’ बघताना तो दगड केवळ समाजाकडे भिरकावला होता. मात्र ‘सैराट’ पाहिल्यानंतर कोणीतरी दगडच डोक्यात घातला आहे, असं वाटत असल्याचं पत्रलेखकाने म्हटलं आहे. पण जाती-पातीच्या, गरीब-श्रीमंत उतरंडीच्या चक्रव्युहात आपण असे फसलो आहोत की आपण किती चुकत चाललो आहोत, याचे भानही राहत नाही. आणि स्वत:ला बरोबर सिद्ध करण्याच्या नादात आपण काय करतो आहोत, हेही कळत नाही, असं लेखकाने म्हटलं आहे. तरीही कित्येकांना आर्चीचं आपल्या आईवडिलांची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लावून परश्याबरोबर पळून जाणं आणि परश्याने आपल्या आईवडिलांचा एकदाही विचार न करता निघून जाणंही रुचलेलं नाही. पौगंडावस्थेतील प्रेमाच्या आकर्षणापोटी आपल्यासाठी दिवसरात्र एक केलेल्या आईवडिलांना सोडताना मुलं एकदाही विचार करत नाहीत. आणि म्हणूनच दुखावलेल्या आईवडिलांमधून पाटील आणि प्रिन्स निर्माण होतात, अशीही भलामण करण्यात आली आहे. या सगळ्या पत्रांमधून कुठेतरी निरागस प्रेम, माणुसकीपेक्षा अजूनही सामाजिक प्रतिष्ठा कुठेतरी जास्त महत्त्वाची वाटते ही जाणीवही तितकीच अस्वस्थ करणारी आहे.

तरुण पिढीने या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. जातीव्यवस्था मानणाऱ्यांसाठी आणि पसरवणाऱ्यांसाठी हा चित्रपट म्हणजे सणसणीत चपराक आहे, अशी भावना व्यक्त होते आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नितीन आगे प्रकरण, खैरलांजी प्रकरणाचाही कित्येकांनी आवर्जून उल्लेख केला आहे. एकीकडे या चित्रपटाच्या शेवटामुळे सुरू झालेले विचारमंथन आहे. तर दुसरीकडे चौदा वर्षांच्या िरकूला कायद्याने बाईक चालवायची परवानगी आहे का? अशी विचारणा करत आक्षेप घेणारे गमतीदार पात्रही आहे. समाजाच्या सगळ्याच स्तरातील लोकांना व्यक्त व्हावं, असं वाटणारा हा मराठीतला पहिलाच चित्रपट ठरला आहे.