दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी आणि अभिनेता अमेय वाघ यांनी सुरू केलेल्या ‘कास्टिंग काऊच’ या वेबमालिकेतील ‘सैराट’च्या टीमबरोबरचा धम्माल एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना आर्ची, परश्या आणि नागराज मंजुळे यांनी दिलेली मजेशीर उत्तरे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आहेत. याशिवाय, ‘प्रिन्स दादा’मुळे या भागाची रंगत चांगलीच वाढली आहे.  भारतीय डिजिटल पार्टी’ या यूट्युब चॅनलवर हा व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे.
पहिली मराठी वेबमालिका असलेल्या ‘कास्टिंग काऊच’चे आजवर तीन भाग प्रदर्शित झाले आहेत. एकाच ‘काउच’वर बसून नटय़ांशी झालेला अनौपचारिक संवाद साधत हे दोघे धमाल उडवून देतात. एका चित्रपटासाठी अभिनेत्रीला कास्ट करण्याच्या धडपडीमुळे याला ‘कास्टिंग काऊच’ नाव देण्यात आले आहे. पहिल्या एपिसोडमध्ये राधिका आपटे त्यानंतर दुसऱ्या एपिसोडमध्ये श्रिया पिळगांवकर आणि तिसऱ्या भागात ‘दिल दोस्ती दुनियादारी’ तील सखी गोखले, पूजा ठोंबरे आणि स्वानंदी टिकेकर या तिघी उपस्थित होत्या.