कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊच आणि लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यातच आता अभिनेत्री पायल राजपूतचाही समावेश झाला आहे. कामाच्या मोबदल्यात एका निर्मात्याने शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचा धक्कादायक खुलासा तिनं केला आहे.

छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केलेली पायल ‘आरएक्स १००’ या तेलुगू चित्रपटामुळे प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिने काही बोल्ड सीन दिले होते. ‘या चित्रपटानंतर आणखी एका चित्रपटाची ऑफर घेऊन एक निर्माता मला भेटायला आला होता. त्याने मला चित्रपटाची कथा ऐकवली आणि त्यानंतर तो जे काही बोलला, ते ऐकून मला धक्काच बसला. त्या चित्रपटाच्या मोबदल्यात त्याने माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्या व्यक्तीचा मला प्रचंड राग आला होता. एका चित्रपटात बोल्ड दृश्य केले म्हणून खासगी आयुष्यात मी कोणासोबतही शरीरसंबंध ठेवू शकते हा घाणेरडा विचार त्याच्या मनात होता,’ असं तिने सांगितलं. त्याचबरोबर केवळ पटकथेची गरज असल्याने मी त्यावेळी बोल्ड दृश्य दिले होते असंही तिने स्पष्ट केलं.

payal rajput
पायल राजपूत

वाचा : करणनंतर आता शिल्पा शेट्टीचं रेडिओवर पदार्पण

पायलने ‘सपनों से भरे नैना’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘महाकुंभ’, ‘आखिर बहू भी तो बेटी ही है’, ‘ये है आशिकी’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या. त्याचबरोबर मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’च्या पंजाबी रिमेकमध्येही तिने मुख्य भूमिका साकारली होती. ‘चन्ना मेरेया’ असं पंजाबी रिमेकचं नाव होतं.