गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अश्या विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारा सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं, कुणी जेवल्यावाचून नाही जायचं हं’ हे लग्नाचे बोल आपणाला ऐकायला मिळतात.
या चित्रपटात मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे असून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती घेरू आणि पीइएसबी यांनी केली केली असून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.
याविषयी ते म्हणतात, ‘चित्रपटाचं दिग्दर्शन ही अत्यंत जबाबदारीची गोष्ट असल्याने त्याचा मी नीट अभ्यास केला. माझ्या चित्रपटात आपल्या आसपास घडणाऱ्या गोष्टी आणि असलेली पात्र अशी एक हलकीफुलकी कथा मी मांडत आहे. सगळ्यांना ती स्वत:ची गोष्ट वाटेल आणि कथानकाशी जोडलं गेल्याची भावना येईल अशाच पद्धतीने लेखन केलं आहे.’
गेल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये जे काही केलं ते नक्कीच वेगळं केलं. अगदी बालगीतांपासून, अभंग आणि अभिजात कवितांपासून लावणीपर्यंत सर्व प्रकारची गाणी रसिकांना दिली आणि त्यांनीही त्या सर्वच गीतांना भरभरून प्रतिसाद दिला. आता आणखी एक नवी वाट चोखाळत असल्याचं सलील यांनी सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 1:52 pm