दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ शौचालय बांधले जात असल्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्यांसोबतच सलमानच्या घरातल्या मंडळींनीसुद्धा या सर्व प्रकरणाविषयी नाराजीचा सूर आळवला होता. पण, आता मात्र परिस्थिती बदलल्याचं पाहायला मिळतंय. कारण, सलमान खानच्या घराजवळचं शौचालय हटवण्याचे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान, सलमानचे वडील सलीम खान आणि काही स्थानिकांनी सोमवारी महापौरांची भेट घेतल्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य कार्यपद्धतीचा अवलंब न केला गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं.

वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरातील रहिवाशांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता हे शौचालय बांधलं जात होतं. त्याशिवाय हा सर्व प्रकार नियमबाह्य असल्यामुळे आता ते शौचालय हटवणार असल्याचं वक्तव्य महाडेश्वर यांनी केलं आहे. ज्या योजनेसाठी मोठ्या अभिमानानं सलमानची ब्रॅण्ड अॅम्बेसिडरपदी निवड करण्यात आली होती त्याच योजनेची अंमलबजावणी केली जात असताना निर्माण झालेल्या गैरसोयीमुळे आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याविषयी प्रसारमाध्यमांसमोर सलीम खान यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. ‘शौचालयं उभारण्यासाठी आमचा काहीच विरोध नाही. उलटपक्षी आमचा या उपक्रमाला पाठिंबाच आहे. पण, लोकांची वर्दळ असणाऱ्या अशा मोक्याच्या ठिकाणी शौचालय उभारणं योग्य नाही.’ असं ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्याशी सहमत होत. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांनीही आपण शौचालयं हटवण्यासाठीच्या अर्जावर सही केली आहे, असं एका वृत्तसंस्थेला सांगितलं होतं.