अभिनेता सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझं करिअर संपवलं, असे धक्कादायक आरोप दिग्दर्शक अभिनव कश्यपने मंगळवारी केले. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित अभिनवने त्याच्या मनातील खदखद बोलून दाखवली. या पोस्टमध्ये त्याने सलमानचे वडील सलीम खान यांचाही उल्लेख केला होता. अभिनव हा अनुराग कश्यपचा भाऊ असून ‘दबंग’सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. त्याच्या या आरोपांवर सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, “हो. आम्हीच सगळं खराब केलंय ना. आधी तुम्ही जाऊन त्यांचे चित्रपट पाहा आणि त्यानंतर आपण बोलू. त्यांनी पोस्टमध्ये माझं नाव लिहिलंय ना. त्यांना कदाचित माझ्या वडिलांचं नाव माहीत नसेल. त्यांचं नाव आहे राशिद खान. त्यांनी आमच्या आजोबा-पणजोबांचंही नाव लिहिलं पाहिजे होतं. त्यांना जे काय करायचं असेल ते करू द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही.”

आणखी वाचा : “मराठी इंडस्ट्रीतही घराणेशाही, मक्तेदारी चालते”; दिग्दर्शक महेश टिळेकर यांचं रोखठोक मत 

काय होते अभिनव कश्यपचे आरोप?

“अरबाज खान, सोहैल खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माझ्या करिअरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळे ‘दबंग २’ सारखा चित्रपट माझ्या हातून गेला. अरबाज खानने माझ्याकडून हा प्रोजेक्ट हिसकावून घेतला. मला माझी साइनिंग रक्कम परत करावी लागली होती. माझ्याशी करार करणाऱ्या निर्मात्यांना धमक्या दिल्या गेल्या. माझ्या कुटुंबीयांतील महिलांवर बलात्काराच्या धमक्या दिल्या गेल्या,” असे गंभीर आरोप त्याने केले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. यानंतर अभिनव कश्यपने फेसबुकवर ही पोस्ट लिहीत सलमान खान व त्याच्या कुटुंबीयांवर धक्कादायक आरोप केले.