सलमान खानसोबत एकत्र काम करण्याची शक्यता अभिनेता शाहरूख खानने फेटाळली आहे. आम्ही दोघेही आपापल्या चित्रपटांमध्ये खूप व्यग्र असल्यामुळे एकत्र काम करणे दोघांनाही तूर्ततरी शक्य नसल्याचे शाहरूख खानने सांगितले.
शाहरूख खानची प्रमुख भूमिका असलेला ‘दिलवाले’ चित्रपट उद्या प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचे प्रमोशन सध्या विविध ठिकाणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या आठवड्याच्या शेवटी सलमान खान सूत्रसंचालन करीत असलेल्या ‘बिग बॉस-९’मध्ये शाहरूख खान येणार आहे. या कार्यक्रमात येण्याची शाहरूखची ही पहिलीची वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मुलाखतीत शाहरूखने सलमानसोबत काम करण्याची शक्यता फेटाळली.
आम्ही दोघेही एकत्र काम करण्याची सध्यातरी कोणतीही योजना नाही. जर कॅलेंडर बघितले, तर आमच्या दोघांच्याही पुढील तारखा बूक झाल्या आहेत. सलमान सध्या सुलतानच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. त्यानंतरही त्याच्याकडे पुढचा चित्रपटाचे चित्रीकरण आहे. त्यानेच मला याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला दोघांना एकत्र काम करणे शक्य नाही, असे शाहरूखने स्पष्ट केले.