काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या अभिनेता सलमान खानला तुरुंगात कोणतीही विशेष वागणूक मिळणार नाही असे जोधपूरच्या तुरुंगाचे डीआयजी विक्रम सिंह यांनी स्पष्ट केले. सलमानने कोणतीही मागणी किंवा विशेष विनंती केलेली नाही असे विक्रम सिंह यांनी स्पष्ट केले. सलमानला कैदी क्रमांक १०६ देण्यात आला असून त्याला दोन नंबर बराकीत ठेवण्यात आले आहे. तुरुंगात आल्यानंतर सलमानची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असे सिंह यांनी सांगितले. त्याला उद्या तुरुंगाचा गणवेश देण्यात येईल.

सलमानला ज्या बराकीमध्ये ठेवले आहे तिथे चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून सलमानला एकटे ठेवणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सलमानच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार असून त्याचे वकिल त्याला केव्हाही भेटू शकतात. वीस वर्षापूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात सलमानला आज पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली.

न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले. त्यापूर्वी सलमान खान, नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू हे सेलिब्रिटीही न्यायालयात पोहोचले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.