एका हातात कात्री घेऊन रस्त्यावर लोकांचे केस कापणारा न्हावी म्हणून सलमान खान तुम्हाला दिसला तर.. त्याच्याकडून केस कापून घेणाऱ्यांचे भले होवो न होवो पण, ज्यांची कात्री त्या दिवसापुरती सलमानने हातात घेतली होती त्यांना मात्र नक्कीच सलमानच्या या केशकर्तन कलेचा फायदा होणार आहे. ‘कलर्स’ वाहिनीवरच्या ‘मिशन सपने’ या कार्यक्रमासाठी सध्या बॉलिवूड कलाकार आपला अभिनयाचा धंदा सोडून मुंबईच्या रस्त्यांवर कधी भाजी विकताना, कधी कोणाचे के स कापताना, वडापाव विकताना दिसत आहेत. अर्थात, या कार्यक्रमासाठी का होईना आपल्याला अभिनय सोडून आणखी काय करता येईल?, याचा विचारही पहिल्यांदाच या मंडळींनी केला आहे.
‘गजनी’च्या प्रसिध्दीसाठी आमिरने लोकांचे डोके भादरले होते. पण, ‘मिशन सपने’साठी सलमानला जेव्हा तुला काय करता येईल, अशी विचारणा झाली तेव्हा क्षणभरासाठी तोही गोंधळला. म्हणजे सलमानची चित्रकला एव्हाना सगळ्यांना अवगत झाली आहे. त्यामुळे फारतर तो रस्त्यावर लोकांची चित्रे बनवून देईल, ही शक्यता होती. पण, बहुधा त्याने आपला प्रिय मित्र आमिरशी सल्लामसलत केली असावी. कारण, त्याने या शोसाठी हातात कात्री घेऊन लोकांचे केस कापणे पसंत केले. त्यादिवशी सलमानसमोर केस कापायला बसलेल्या अनेकांना धन्य धन्य वाटले असेल. पण, मुलांचे केस सहजपणे कापून देणाऱ्या सलमानला मुलींचे केस कापणे फारच अवघड होऊन बसले. तेव्हा त्याने मी त्यांचे केस कापणार नाही पण, त्यांना मसाज करू देईन. म्हणून नवी सेवा देऊ केली.
आता केस कापून जे पैसे मिळालेत ते एका गरजू व्यक्तीला मिळणार आहेत. शोच्या निमित्ताने का होईना नेहमीच्या सुखसोयींमधून बाहेर पडून आजचे आघाडीचे म्हणवले जाणारे स्टार कलाकार आपल्या कलेच्या जोरावर सामान्यांना पैसे मिळवून देण्यासाठी काय काय करू शकतात, याची गंमत पाहता येणार आहे. रणबीर कपूरने या शोसाठी वडापाव विकले, तर सिध्दार्थ मल्होत्राने भाजी विकून दाखवली, रोनित रॉयने गाडीवर सौंदर्यप्रसाधनांची विक्री केली तर राम कपूरने एका दिवसासाठी ड्रायव्हर होणे पसंत केले. अगदी हरभजन सिंगनेही आपली फटकेबाजी सोडून हातगाडीवर बिस्कीटे विकली.