ज्याप्रमाणे सलमान खानचे बॉलिवूडमधील मैत्रीचे किस्से चर्चिले जातात, त्याप्रमाणे त्याचे अनेकांशी असलेले शत्रुत्वाचे किस्से देखील ऐकायला मिळतात. बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान आणि त्याच्या भांडणाचा किस्सा तर चांगलाच प्रसिध्द आहे. एकेकाळी चांगले मित्र असलेल्या बॉलिवूडमधील या दोन आघाडीच्या स्टार्समध्ये २००८ साली कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत खडाजंगी झाली आणि दोघांनी एकमेकांपासून दूर राहणे पसंत केले. या पार्श्वभूमिवर गेल्या इफ्तार पार्टीत सलमानने शाहरूखला स्वत:हून मिठी मारत भेटण्यासाठी पुढाकार घेतल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. याच विषयावर करण जोहरने ‘कॉफी विथ करण’ या त्याच्या शोमध्ये सलमानला छेडले असता तो म्हणाला, त्या पार्टीत जर त्याला डावलून मी पुढे गेलो असतो, तर ते चूकीचे ठरले असते… तिथे त्याला बसलेला पाहिल्यावर मी भेटण्यासाठी थांबलो. माध्यमात येणाऱ्या सलमान आणि शाहरूखमधील वॉरच्या बातम्यांविषयी करणने विचारले असता सलमान म्हणाला, आमच्यात वॉर वगैरे काही नसून, दोन चांगल्या मित्रांमध्ये एका रात्री बिनसले आणि दोघे एकमेकांपासून दुरावले. ह्या प्रकारामुळे मी खूप व्यतिथ झालो. त्याच रात्री मला भेटून शाहरूख या घटनेवर पडदा टाकू शकला असता. पण तसे न करणे त्याने पसंत केले आणि मी ही ठिक आहे म्हणालो. त्यानंतर तुझ्याच शोमध्ये तो माझ्या विषयी बोलला. दिवसातून चार ते पाच वेळा तो माझ्या घरावरून जातो. एकदाही त्याला मला भेटायला यावेसे वाटत नाही.
त्या इफ्तार पार्टीनंतर आपण शाहरूखला एसएमएस पाठविल्याचे सलमानने करणला सांगितले. शाहरूखबद्दल आपल्याला खूप आदर असल्याचे म्हणत, आता आपण दोघे पुन्हा ‘चांगले मित्र’ होऊ शकणार नसल्याचे सलमानने कबूल केले.
सलमानने शाहरूखच्या कामाची स्तुती करत, शाहरूख खानप्रमाणे प्रेमाच्या दृष्यातील उत्कटता कोणीही दाखवू शकत नसल्याचे म्हटले. सलमान पुढे म्हणाला, आम्ही पुन्हा कधीच चांगले मित्र होऊ शकणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे. असे असले तरी शाहरूखबद्दल मला खूप आदर आहे. जेव्हा इंडस्ट्रीतले काहीजण स्वार्थाने शाहरुखबाबत माझ्याकडे चहाडी कतात, तेव्हा मला प्रचंड चीड येते. शाहरुख आणि मी खूप मोठा काळ एकमेकांबरोबर घालविला आहे.
गेल्या महिन्यात, बॉलिवूडमधील महान पटकथाकार आणि सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सलमान आणि शाहरुख एकमेकांचे प्रतिस्पर्धी असून, देघांमध्ये पुन्हा मैत्रीपू्र्ण संबध प्रस्थापित होणार नसल्याचे म्हटले होते. असे असले तरी, सलमानच्या दिवाळी पार्टीला शाहरूखची पत्नी गौरी खानने उपस्थिती लावली होती.