‘टय़ूबलाइट’चा तिकीटबारीवर पूर्ण ‘फ्यूज’ उडाल्यानंतरही न डगमगता भाई पुन्हा परतला आहे. दैवयोगाने, डिसेंबरमध्ये एके काळी तो ज्या दिग्दर्शकाचा लाडका कलाकार होता त्या भन्साळींचा ‘पद्मावती’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित होणार असल्याने त्याची स्पर्धा सलमानच्या चित्रपटाला असेल असा तर्क लावला जात होता. पण तसेही काही झाले नाही. त्यामुळे या वर्षीच्या अखेरच्या महिन्यात पुन्हा ‘टायगर’च राजा ठरणार आहे. निदान तिकीटबारीवर त्याच्याबरोबरीने झळकणारं तरी कोणीही नाही. एवढं चांगलं वातावरण असलं तरी ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल घेऊन येत असलेल्या सलमान खानला ‘टायगर जिंदा है’ सुपरहिट होणं फार गरजेचं आहे. नाही म्हटलं तरी पुढच्या वर्षांची निदान चांगली सुरुवात होण्यासाठी का होईना हिटची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे..

‘टायगर जिंदा है’च्या प्रसिद्धी कार्यक्रमांनी अजून हवा तसा वेग घेतला नसला तरी कुठे ना कुठे मुलाखती वा कार्यक्रमांच्या निमित्ताने सलमान खान पुन्हा माध्यमांसमोर प्रकटला आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘टय़ूबलाइट’ हा त्याचा या वर्षीचा पहिला आणि महत्त्वाकांक्षी बिग बजेट चित्रपट आपटला. त्यामुळे आता ‘सुलतान’चा दिग्दर्शक अली अब्बास जफ्फरबरोबर केलेला ‘टायगर जिंदा है’ हा सिक्वलपट त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे. स्टार कलाकारांना सुपरहिट चित्रपटांचं दडपण कायम डोक्यावर असतं. चित्रपट निर्मिती संस्थांना कायम मोठे कलाकारच हवे असतात. त्यांना चित्रपट हिट ठरण्यासाठी बडय़ा कलाकारांनाच घेतलं पाहिजे असं वाटतं. ती चांगली गोष्ट आहे, मात्र ते दीर्घकालीन समीकरण नाही, असं सलमान म्हणतो. निर्मिती संस्थांनी कायम गुणवत्ता असलेल्या कलाकारांच्या शोधात असलं पाहिजे, त्यांना शोधून त्यांच्यावर मेहनत घेतली पाहिजे. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे पण ते यशस्वी ठरलेले नाहीत त्यांचा पाठपुरावा करून त्यांना यशापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणं हे कंपन्यांना जमू शकतं. त्यांनी तसं केलं पाहिजे, असं त्याने सांगितलं.

सध्या हॉलीवूडसह सगळ्याच चित्रपटसृष्टीला ‘कास्टिंग काऊच’ प्रकरणाने वेढून टाकलं आहे. बॉलीवूडमध्ये ही गोष्ट नवीन नाही. काही वर्षांच्या गॅपनंतर दरवेळी कोणी ना कोणी याबद्दल जाहीर बोलतं, संबंधित दिग्दर्शक- निर्माते- कलाकार यांच्याकडे बोटं उठतात. पुढे फार काही घडत नाही आणि दुसरा अंक सुरू होता. मात्र आता हॉलीवूडमध्ये थेट हार्वे वेन्स्टिनसारख्या बडय़ा निर्मात्याला सगळ्यांसमोर उघडं केल्यानंतर जगभरात त्याचे सकारात्मक पडसाद उमटले आहेत. याबद्दल बॉलीवूडमध्येही उघडपणे बोललं जाऊ लागलं आहे. ‘फुकरे रिटर्न्‍स’च्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना अभिनेत्री रिचा चढ्ढानेही हिंदी चित्रपटसृष्टीतील कास्टिंग काऊचचा उल्लेख केला. याविषयी खुलेपणाने बोलायला गेलं तर बॉलीवूडमधील अनेक आघाडीच्या कलाकारांना बाहेर पडावं लागेल, असं रिचाने म्हटलं होतं. याचाच संदर्भ घेत सलमान खानलाही याविषयी विचारणा झाली, मात्र आपण स्वत: कधी बॉलीवूडमधील ‘कास्टिंग काऊच’विषयी ऐकलेलं नाही, असं त्याने स्पष्ट केलं. ‘कास्टिंग काऊच’ हिंदी चित्रपटसृष्टीत खूप वर्षांपासून आहे हे मीही ऐकून आहे. माझ्यापेक्षाही माझे वडील या इंडस्ट्रीत खूप वर्षांपासून आहेत, पण त्यांच्याकडूनही मी कधी असे प्रसंग ऐकलेले नाहीत किंवा कोणी थेट येऊन बोललेलंही मी पाहिलेलं नाही. पण खरोखरच अशा कोणी व्यक्ती असतील इंडस्ट्रीत ज्या तुम्हाला इंडस्ट्रीत पुढे जाण्यासाठी त्यांच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवलेच पाहिजेत हा नियम असल्यासारखे वागवत असतील, तर हे फार निंदनीय आहे. माझ्याकडे कोणी प्रत्यक्ष येऊन असा अनुभव त्यांना आल्याचं सांगितलं तर मी त्यांना चांगल्या चित्रपटकर्मीकडे घेऊन जाईन, असंही तो म्हणाला.

बॉलीवूडमध्ये आघाडीच्या कलाकारांमध्ये सलमानचं नाव घेतलं जातं. मात्र आजही आपलं आयुष्य हे कठोर मेहनतीने भरलेलं आहे, असं तो म्हणतो. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटासाठी सलमानला पुन्हा आपलं वजन कमी करण्यापासून विशिष्ट प्रकारे देहयष्टी घडवण्यावर भर द्यावा लागला. या चित्रपटात उच्च दर्जाची अ‍ॅक्शन दृश्यं त्याला साकारायची होती. पडद्यावर हे स्टंट्स अचूक वठवण्यासाठी त्याला चित्रपटाआधी आणि चित्रीकरण सुरू झाल्यावरही विशिष्ट प्रकारचं प्रशिक्षण आणि सराव करावा लागला होता. आपलं आयुष्य हे सगळ्यात कंटाळवाणं असल्याचं तो सांगतो. एखाद्याला माझं आयुष्य जगावंसं वाटलं तर त्याला ते फार कं टाळवाणं आणि थकवणारं वाटेल, असं तो ठामपणे सांगतो. पडद्यावरची त्याची प्रतिमा लोकप्रिय असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याची वक्तव्यं, त्याचं वर्तन या गोष्टींमुळे तो कायम टीकेचा धनी होत आला आहे. ‘गेली तीस वर्ष मी इंडस्ट्रीत काम करतो आहे. मला नेहमी सांगितलं जातं की, तुझ्याबद्दल लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. कोणी इतकी वर्ष एखाद्याला चुकीचं कसं समजू शकतात हेच मला कळत नाही. मी आठवडय़ाचे सगळे दिवस, २४ तास सतत काम करीत असतो. एवढं काम करूनही मी आज छोटय़ा घरात राहतो आहे. इतरांचंच काय, माझ्या आईवडिलांनाही मीच काही चुकीचं बोललो असेन असं वाटत राहतं. जोपर्यंत ते स्वत: व्हिडीओ बघत नाहीत तोवर त्यांचा माझ्यावर विश्वास बसत नाही. पण तरीही माझी मेहनत सुरूच आहे’, असं तो  स्पष्ट करतो. सलमानच्या भोवती असलेल्या कोर्टखटल्यांचा विळखा सुटलेला नाही. ते दडपण, तो ताण कायम घेऊन मी माझं काम करतो. शेवटी ‘शो मस्ट गो ऑन’.. त्यामुळे कितीही खटला असला तरी मला हसत-हसतच लोकांसमोर वावरायला हवं, माझं चित्रीकरण करायला हवं, अशा शब्दांत सलमानने त्याची खंत व्यक्त केली. ‘एक था टायगर’ २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाने त्याला शंभर-दोनशे कोटींची विक्रमी कमाई करून देत या कोटी क्लबचा नायक असं शिक्कामोर्तब करून दिलं होतं. त्यामुळे आता पाच वर्षांनी प्रदर्शित होणारा हा सिक्वलपट काही तरी करामत करील, या आशेनेच हा चित्रपट व्यावसायिकरीत्या सर्वोत्तम ठरावा यासाठी त्याने एकही कसर सोडलेली नाही. ‘टायगर’ला प्रेक्षक त्याच प्रेमाने स्वीकारतील का? याचं उत्तर सलमानसाठीच नाही तर सध्या बॉलीवूड उद्योगासाठीही महत्त्वाचं झालं आहे.