बॉलीवूडचा दबंग खान सलमानच्या आयुष्यात अनेक मैत्रिणी आल्या, त्याचे प्रेम जमले, पण हे नाते लग्नसंस्थेत परिवर्तित झाले नाही. पण, त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रोमानियातील टीव्ही अभिनेत्री लुलिया वेंतुर आणि सलमानचा साखरपुडा झाल्याची चर्चा आहे.
पिकंविलाच्या वृत्तानुसार, लुलिया ही रोमानियाला परतली असून, तिच्या पीआरने सलमान आणि तिचा साखरपुडा झाल्याचे सांगितले. तसेच, ते पुढील वर्षी लग्नगाठीत अडकणार असल्याचेही तो म्हणाला. लहान बहिण अर्पिताच्या लग्नावेळी सलमानने आपल्या घरच्यांना लुलियाची भेट त्याची प्रेयसी म्हणून करुन दिल्याची त्यावेळी चर्चा रंगली होती. पण, त्याच्याकडून याबाबत अधिकृतरित्या काहीचं जाहीर करण्यात आलेले नाही. आतापर्यंत सलमान त्याला विचारण्यात आलेल्या लग्नाबद्दलच्या प्रश्नांना उडवत आलेला आहे. पण ‘बिग बॉस-९’च्या निमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी बोलताना तो म्हणला की, मी कोणाशी आणि किती दिवसांसाठी लग्न करू?  आता लग्न हे आयुष्यभरासाठी नसते. काळ बदलला असून लग्न तात्पुरते असते, असे सलमानने म्हटले होते. त्यामुळे पुन्हा एकदा सलमानाच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.