एखाद्या मराठी चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याचा गाजावाजा होण्याचे तसे काही कारण नसते. पण सतीश राजवाडे दिग्दर्शित आगामी ‘सांगतो ऐका’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याला दस्तरखुद्द सलमान खान येणार असल्याने या सोहळ्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. परंतु ऐन सोहळ्यात फोटोग्राफरनी सलमानवर बंदी घातली. सलमान खान मंचावर असेपर्यंत त्यांना कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.
‘सांगतो ऐका’ने सुरुवातीपासूनच उत्सुकता निर्माण केली होती. त्यात सोशल मिडियावर  चित्रपटातील ‘फँटास्टिक’ ही लावणी गाजत आहे. विधि कासलीवाल निर्मित या चित्रपटामध्ये सचिन पिळगाकरांची मुख्य भूमिका असून, या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ते आणि सतीश राजवाडे एकत्र आले आहेत. नुकताच चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. सोहळ्याला अशोक सराफ, रिमा लागू, पुष्कर श्रोत्री, श्रेयस तळपदे आदी मातब्बर मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. पण सोहळ्याचे मुख्य आकर्षण होता सलमान खान!
सलमानच्या उपस्थितीमुळे सतीश राजवाडेसह सर्व मराठी कलाकार सुखावले असले तरी, फोटोग्राफरनी सलमानवर बंदी घातली. ज्याक्षणी सलमान मंचावर आला त्याक्षणी फोटोग्राफरनी मघार घेतली. सलमानच्या चित्रपटाच्यावेळी फोटोग्राफर्सशी झालेल्या बाचाबाचीनंतर माध्यमातील सर्व फोटोग्राफरनी त्याच्यावर बंदी घातली आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात बोलताना, सलमानने आपण फोटोग्राफरची माफी मागणार नाही. त्यांनी शांतपणे आपले फोटो काढले तर आपली काही हरकत नाही, असे सांगितले होते. या घटनेचे प्रतिसाद या सोहळ्यात उमटले. तरीही वेळ मारून नेत सोहळा साग्रसंगीत पार पडला. यावेळी सलमानने ‘लय भारी’मध्ये छोटाशी भूमिका साकारल्यानंतर आता, आपली मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करण्याची इच्छा असल्याचे, बोलून दाखवले.