20 November 2019

News Flash

जाणून घ्या, कोण आहे सलमानच्या आयुष्यातील प्रामाणिक समीक्षक

सलमान खानचा 'भारत' सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे.

सलमान खान

सलमान खानचा ‘भारत’ सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. नुकतंच सलमान व कतरिनाने १९४७ साली झालेल्या फाळणीमुळे विभक्त झालेल्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि काही काळ त्यांच्यासोबत घालवला. या कार्यक्रमात सलमान म्हणाला की, “हा चित्रपट बघितलेल्या सगळ्या प्रेक्षकांचा मी खूप आभारी आहे. ज्यांनी हा चित्रपट बघितला नाहीये त्यांना मी सांगेन की, तुम्ही हा चित्रपट जरूर बघा. हा एक उत्तम चित्रपट आहे.”

चित्रपटाविषयी समीक्षक काय म्हणतात हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक कलाकाराला असते. “मित्र, कुटुंबीय की चाहते कोणाचे समीक्षण खूप प्रामाणिक असते?” असा प्रश्न सलमानला विचारला असता तो म्हणाला की, “माझे बाबा हे माझ्यासाठी सगळ्यात उत्तम व प्रामाणिक समीक्षक आहेत. ‘भारत’पाहिल्यानंतर त्यांनी ‘पिक्चर बडी हिट है” अशी प्रतिक्रिया दिली होती.

चित्रपटाचे यश हे कलाकाराला समाधान देणारे असते. या चित्रपटाच्या यशाबद्दल बोलताना सलमान म्हणाला की,” ‘भारत’ या चित्रपटासाठी आम्ही सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे. या चित्रपटावर आमचा विश्वास होता. या चित्रपटाच्या यशाचे श्रेय चाहत्यांचे आहे. मी मनापासून त्यांचे आभार मानतो.”

‘भारत’ने आतापर्यंत बुधवार- ४२.३० कोटी रुपये, गुरुवार- ३१ कोटी रुपये, शुक्रवार- २२.२० कोटी रुपये, शनिवार- २६.७० कोटी रुपये, रविवार- २७.९० कोटी रुपये व सोमवारी ९.२० कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी नुकतीच २०१९ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांची यादी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यादीनुसार ‘भारत’ दुसऱ्या स्थानावर आहे.

First Published on June 13, 2019 11:18 am

Web Title: salman khan bharat honest critic djj 97
Just Now!
X