दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपटाची भेट घेऊन येतो. यंदा ५ जून रोजी सलमानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘भारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका विश्वचषक सामना रंगणार आहे. त्यामुळे क्रिकेट विरुद्ध चित्रपट असाच सामना पाहायला मिळणार आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील १५ सामने आयनॉक्स थिएटर्समध्ये दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक सलमानचा ‘भारत’ निवडणार की भारताचा सामना हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

एकीकडे विश्वचषकाचा सामना लाइव्ह सिनेमागृहात रंगणार तर दुसरीकडे सलमानचा ‘भारत’ प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या चित्रपटाची प्रेक्षकांना फार उत्सुकता असते. ‘भारत’मध्ये सलमान आणि कतरिना कैफ ही प्रेक्षकांची आवडती जोडी झळकणार आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकींगला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. दुसरीकडे मुंबई, कोलकाता, जयपूर, बेंगळुरू, नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद, इंदौर, वडोदरा आणि सुरत या शहरातील क्रिकेटप्रेमींना आयनॉक्स थिएटरमध्ये लाइव्ह सामना पाहता येऊ शकणार आहे.

सलमानचे ‘रेस ३’ आणि ‘ट्युबलाइट’ हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर विशेष कामगिरी करू शकले नव्हते. ‘टायगर जिंदा है’ हा कतरिनासोबतचा चित्रपट मात्र चांगलाच गाजला. त्यानंतर पुन्हा एकदा ही जोडी एकत्र आली आहे. सलमान, कतरिनासोबतच यामध्ये सुनील ग्रोव्हर, जॅकी श्रॉफ, सोनाली कुलकर्णी, दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. अली अब्बास दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी कमाईचे विक्रम मोडणार का हे पाहावं लागेल. विश्वचषक की सलमानचा चित्रपट यापैकी प्रेक्षक काय निवडतील हे ‘भारत’च्या बॉक्स ऑफीस कमाईवरूनच लक्षात येईल.