काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायलयाने धक्का दिला. न्यायालयाने सलमानला दोषी ठरवतानाच या प्रकरणात अन्य आरोपींना दोषमुक्त केले आहे. यामुळे सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले. त्यापूर्वी सलमान खान, नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू हे सेलिब्रिटीही न्यायालयात पोहोचले होते. यावेळी सलमानच्या बहिणी अलविरा आणि अर्पिता तेथे उपस्थित होत्या.

सलमानला काळवीट प्रकरणात दोषी ठरवले गेले त्यावेळी तो खाली मान घालूनच बसला होता. आपल्या समोर भविष्यात काय वाढून ठेवले आहे याची त्याला जणू कल्पना आली होती. त्याक्षणी तो भावूकही झाला. पण आपला भाऊ रडतोय हे जगाला दिसू नये यासाठी अलविराने लगेच त्याला गॉगलही घातला. पण भावाला आधार द्यायला आलेल्या अर्पिता- अलविरा यांनाही अश्रू अनावर झाले आणि त्या सलमानसमोरच रडू लागल्या. पण सलमानची काळजी त्यांना इतरांपेक्षा जास्त असल्याने अलविराने त्याला चटकन अॅण्टी डिप्रेशनच्या गोळ्या आणि प्यायला पाणी दिले.

आज ५ एप्रिलला सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. सलमानने जामिनासाठी अर्जही केला. पण या अर्जावर सुनावणी उद्या होणार असल्यामुळे आजचा एक दिवस तरी सलमानला तुरूंगातच राहावं लागणार आहे. वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. शिकारीच्या घटनास्थळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल झाला होता.