बिग स्टार, बिग बजेट चित्रपट आणि २००-३०० कोटींच्या कमाईचे आकडे ही समीकरणे बॉलीवूड खानावळीच्या बाबतीत इतकी फिट्ट बसलेली आहेत की त्यांचं एखादं गणित चुकलंच तर जसा नफा त्यांचा तसाच तोटाही त्यांचा म्हणून ते डोक्यावर घेण्याची नामुष्कीही त्यांच्यावर ओढवते. एकहाती प्रेक्षकांना चित्रपटगृहात ओढून आणणारे कलाकार म्हणून  ख्याती असलेल्या सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर खान या तिकडीला गेल्या एक-दोन वर्षांत बिग फ्लॉपचा चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे ‘टय़ूबलाइट’ने केलेला अंधार पचवल्यानंतर आता त्यावेळी झालेल्या चुका भारतच काय पुढच्या कुठल्याच चित्रपटात करायच्या नाहीत, असा कानाला खडाच जणू सलमान खानने लावला आहे.

दोन वर्षांपूर्वी ईदच्याच मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘टय़ूबलाइट’ फ्लॉप झाल्यानंतर सलमानला मोठाच फटका बसला होता. त्याचवर्षी प्रदर्शित झालेल्या ‘टायगर जिंदा है’ चित्रपटाने त्याला निदान आधार दिला. मात्र वेगळे काही करू पाहण्याच्या नादात या चित्रपटाला आलेले अपयश सलमान खानला अजूनही पचवता आलेले नाही, हे त्याने आता ‘भारत’च्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीमधून स्पष्ट झालं आहे. ‘भारत’ हा अली अब्बास जफर दिग्दर्शित सलमान-कतरिना जोडीचा चित्रपट यावर्षी पुन्हा ईदच्याच मुहूर्तावर प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर भावनिक नात्यांची गुंतागुंत असलेला असा हा चित्रपट असेल, अशी अटकळ प्रेक्षकांनी बांधायला सुरुवात केली आहे. सलमानने मात्र सावधपणे हा चित्रपट अजिबात भावनिक नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘टय़ूबलाइट’ हा चित्रपट खरोखरच भावनिक होता, त्यात दोन भावांची ताटातूट केंद्रस्थानी होती. मात्र दोन भावांमधील इतक्या भावनिक नात्याची कथा रंगवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अजिबात आवडला नाही. त्यामुळे ‘भारत’ या चित्रपटात आम्ही ती चूक केलेली नाही, असं तो म्हणतो. भारत हा पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीचा मनोरंजक चित्रपट असल्याचे त्याने सांगितले. प्रेक्षकांना चित्रपटात गाणं, हिरोची कथा असं जे काही हवं असतं ते सगळं या चित्रपटात आहे, असं सलमान सांगतो. हा चित्रपट ऑडे टु माय फादर या कोरिअन चित्रपटावर बेतलेला आहे. सलमानचा मेव्हणा अभिनेता अतुल अग्निहोत्री याने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. या चित्रपटाची गोष्ट खूपच सुंदर आहे, मात्र त्याचा रिमेक करताना संपूर्णपणे आपल्या देशातली कथा दाखवायची असल्याने अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आला आहे, असं सलमानने सांगितलं. गोष्टीतील व्यक्तिरेखा, त्यांचे संदर्भ पूर्णपणे बदलले आहेत, मूळ कथा कायम ठेवून बाका सगळा तपशील हा इथल्या मातीतला असायला हवा, या पद्धतीनेच पटकथा लिहिली गेली असल्याचंही त्याने सांगितलं.

‘भारत’ची कथा ही वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. फाळणीनंतर एकीकडे स्वतंत्र भारताची कथा आणि त्याला समांतर जाणारी भारत नावाच्या तरुणाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मुळात ही कथा अशा एका नात्यावर आधारित आहे जे घराघरांतून आहे. प्रत्येक मुलगा आपल्या वडिलांवर तितकंच प्रेम करत असतो. त्यामुळे ही कथा घराघरातील वडील-मुलाची कथा असल्याने प्रेक्षक त्याच्याशी जोडले जातील, असा विश्वास सलमानला वाटतो.

‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षी सिन्हा दिसणार का?, यावरूनही अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. फ्रँचाईझी चित्रपटांचा विचार करता त्यातील कलाकार बदलणार नाहीत हे सांगताना ‘दबंग ३’ मध्ये सोनाक्षी असणारच, ‘किक’ चित्रपट जॅकलिनशिवाय आणि ‘टायगर’ चित्रपट मालिका ही कतरिना नसेल तर पूर्णच होऊ शकत नाही, असं तो म्हणतो. यावर्षी आणखी एक वेगळी गोष्ट त्याच्या कारकीर्दीत घडते आहे ती म्हणजे तो खूप वर्षांनी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर काम करतो आहे. ‘इन्शाहअल्ला’ या नावाने प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात सलमान पहिल्यांदाच अलिया भट्टबरोबर काम करणार आहे. अलियाबरोबर काम करण्यासाठी आपण खरोखच उत्सुक होतो, असं त्याने स्पष्ट केलं. ‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ ते ‘राझी’ अशा चित्रपटांमधून अलिया ज्या पद्धतीने एक सक्षम अभिनेत्री म्हणून पुढे आली आहे, त्याबद्दल कौतुक वाटत असल्याचं तो सांगतो. मात्र तिने तिची कारकीर्द स्वत: घडवली आहे, इतर कोणीही त्याचं श्रेय घेऊ शकत नाही, अशा शब्दांत त्याने अलियाचं कौतुक केलं. त्याचबरोबर या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भन्साळींबरोबर काम करायला मिळत असल्यानेही तो आनंदी आहे. सध्या तरी ‘दबंग ३’ आणि ‘इन्शाहअल्ला’ या दोनच चित्रपटांवर काम सुरू आहे. इतर अनेक चित्रपटांच्या कथाकल्पना विचाराधीन आहेत, मात्र काही ठोस ठरलेले नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

हे वर्ष गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यासाठी सुखदायक ठरेल, असं त्याला वाटतं आहे. यावर्षी त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकूणच भारत, दबंग ३ आणि पाठोपाठ येणाऱ्या आगामी चित्रपटांमुळे तो आनंदित असल्याचं जाणवतं. त्याचा हा आनंद सध्या तरी त्याच्या बोलण्यातून झळकतो आहे. आता तो पुढेही वर्षभर टिकणार की नाही?, याचं उत्तर ईदला ‘भारत’ देईलच!

नको रे बाबा..

‘बिग बॉस’च्या नव्या पर्वाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सूत्रसंचालक म्हणून सलमान राज्य करणार आहे. शिवाय, एका चित्रपटाची निर्मितीही तो करतो आहे. या सगळ्यात नेहमीप्रमाणे त्याच्या लग्नाचा विषयही निघतोच. त्यावरही सलनीन त्याच्या त्याच खेळकर शैलीत मला लग्न नको, मला मुलं हवी आहेत, असं म्हणतो. मला मुलं हवी आहेत, पण मुलं म्हटली की त्यांना आई हवी. ते शक्य नसल्याचंही त्याने सांगितलं.

‘केवळ ईदच नाही..’

दरवर्षीप्रमाणे यावेळीही सलमानच्या चाहत्यांना ईदी म्हणून त्याचा नवा चित्रपट पाहायला मिळणार का.. असं विचारताच त्याला हे एकाच सणाशी जोडलं जाणं त्याला फारसं पटत नाही. दरवेळी चित्रपट प्रदर्शित करताना एक चांगली, लोकांना सुट्टी असलेली अशी तारीख निवडली जाते. मात्र ईदलाच चित्रपट ठरवून प्रदर्शित केला जात नाही, हेही तो स्पष्ट करतो. यावर्षी दबंग ३ नाताळमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी माझे अनेक चित्रपट दिवाळीतही प्रदर्शित झालेले होते. त्यामुळे ईद आहे म्हणून चित्रपट प्रदर्शित होतोय असे नाही तर सणाचा दिवस असल्याने एकतर सुट्टी असते, आनंदाचे वातावरण असते, लोकांच्या खिशात पगाराचा पैसा खुळखुळत असतो. त्यामुळे ते सहकुटुंब चित्रपट पाहण्यावर भर देतात. या विचारानेच हल्ली सणांना चित्रपट प्रदर्शित केले जातात, असं तो म्हणतो.