बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचे लाखो चाहते त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. परंतु, टि्वटर आणि फेसबुक हे बकवास असल्याचे सलमान खानचे म्हणणे आहे. बेरोजगार चाहत्यांना नोकरी शोधण्यासाठी मदत करण्याची अनोखी कल्पना सोशल मीडियावर राबविण्याचे सलमान खानने ठरवले आणि त्यासाठी एका वेबसाईटची निर्मिती देखील केली. परंतु, खूप मोठ्या प्रमाणावर चाहत्यांनी या वेबसाईटला भेट दिल्याने सदर वेबसाईट बंद पडली. अलिकडेच ‘किक’ चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमात सलमानने फेसबुक आणि टि्वटरला बकवास म्हणून संबोधले. त्याचबरोबर या सोशल साईट्सवर त्याच्या पोस्टना चाहत्यांकडून मिळत असलेला मोठ्या प्रमाणावरील प्रतिसाद पाहून, आश्चर्य व्यक्त करत, चाहत्यांना काही कामधंदा आहे का नाही, अशी शंका उपस्थित केली. याविषयी बोलताना सलमान म्हणाला, टि्वटर आणि फेसबुक या बकवास गोष्टी आहेत. काही कामधंदा नाही मग बसले टि्वटर आणि फेसबुक पाहात. कधी कधी मला वाटतं की, तुम्ही काही कामधंदा करता की नाही. मला जेव्हा कंटाळा येतो तेव्हा मी एखादे टि्वट करतो ‘आज काय चाललय?’ कधी चपलेचा किंवा असेच कुठले तरी छायाचित्र काढून पोस्ट करतो. त्यावरसुद्धा पटापट प्रतिक्रिया येतात. हे बघून मी विचार करतो, हे कुठे आहेत, कामावर आहेत, शाळेत आहेत, कुठे आहेत ही माणसं, हे झोपत वगैरे नाहीत. त्यामुळे, टि्वटर आणि फेसबुकसारख्या सोशल साईट बकवास असल्याचे माझे मानणे आहे. अशा बकवास गोष्टींना जरा बाजूला सारा, असा सल्ला देखील त्याने चाहत्यांना दिला. असे असले तरी, भविष्यात सामाजिक कामासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचा सलमानचा मानस आहे.