सलमान खानचा ५१ वा वाढदिवस नुकताच म्हणजे २७ डिसेंबर रोजी पार पडला. त्यानिमित्त त्याच्या ३५ व्या वाढदिवसाची आठवण सांगायचा योग फार छान म्हणायला हवा. विशेष म्हणजे त्याने तो आम्हा सिनेपत्रकारांच्या उपस्थितीत पार पाडला व त्यासाठी त्याने आपल्या चित्रपटाच्या सेटवर तो योग जुळून आणला होता. तो चित्रपट होता वासू भगनानी निर्मित व सोहेल खान दिग्दर्शित ‘प्यार किया तो डरना क्या’ आणि स्थळ होते मेहबूब स्टुडिओ. नेमकी त्याच दिवशी सेटवर काजोल नव्हती. लंच ब्रेकमधे सेटबाहेरच भला मोठा केक कापून सलमानने वाढदिवस साजरा तर केला पण त्या काळात तो प्रसार माध्यमापासून काहीसा दूर असे.

ते प्रामुख्याने मुद्रित माध्यमाचे दिवस होते व सेटवर अशा घडणाऱ्या गोष्टींना वृत्त मूल्य होते. त्या दिवसाचे चित्रीकरण संपवून सलमान पनवेलला आपल्या फार्म हाऊसवर जाणार असून तेव्हाच तो जवळच्याच गावातील नागरिकांचे थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून घोंगडी वाटप करणार आहे हे तेव्हाच पहिल्यांदा समजले व तो नुसताच फिल्मी नाही तर त्याला सामाजिक जाणीव देखील आहे याची जाणीव झाली.

पुढे काही वाद वादळासह त्याची वाटचाल सुरु असतानाच हेच दोन्ही घटक त्याच्यासोबत राहिलेत. या छायाचित्रात तो कसा व केवढा दिसतोय बघा. सिक्स पॅक्सचे तोपर्यंत महत्व रुजले नव्हते. सलमान बराचसा कौटुंबिक चित्रपटाचा हीरो असाच ओळखला जाई. त्याचा ‘प्रेम’ नायक याच मार्गावरुन जाई. या सगळ्यात महत्त्वाचे काय, तर आपल्या वाढदिवसाच्या दिवशीही सलमानने तेव्हा चित्रीकरण करण्यात विशेष रस घेतले होते. पण चित्रपटाचे निर्माते मात्र अशा गोष्टी विसरत नसतात,  ते आपल्या प्रमुख कलाकाराचा वाढदिवस नक्कीच लक्षात ठेवतात व असा मीडियासोबत साजराही करतात.