‘सुलतान’ चित्रपटाचा गाजावाजा नाही असे ठिकाण शोधून सापडणे कठीणंच. इंटरनेटसह सर्व प्रसारमाध्यमांमध्ये सलमान खान व अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘सुलतान’ चित्रपटाच्या प्रत्येक लहानमोठ्या बातमीला प्रसिद्धी दिली जात आहे. या प्रसिद्धीच्या माहोलात ‘कॉमेडी नाइट्स लाइव्ह’, ‘चला हवा येउद्या’ यांसारख्या विनोदी कार्यक्रमांनीही ‘भाईजान’ला आमंत्रित करत ‘सुलतान’च्या प्रसिद्धीत सहभाग घेतला. या विनोदी कार्यक्रमांमधून खळखळून हसणाऱ्या सलमानने काही कारणांसाठी कपिल शर्माचा नवा कार्यक्रम ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये येण्यास नकार दिला होता. कपिलचा कार्यक्रम नाकारत सलमानने त्याचा प्रतिस्पर्धी कृष्णा अभिषेकच्या कार्यक्रमात हजेरी लावत, कार्यक्रमाची रंगत वाढवली. पण आपल्या ‘कमिटमेंट’साठी ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने ‘कमिटमेंट’ बदलंत सरते शेवटी कपिल शर्माच्या विनोदी ‘मोहल्ल्यात’ हजेरी लावली आहे. कपिल शर्माची लोकप्रियता पाहता त्याच्या कार्यक्रमात येण्याबद्दलच्या सलमानने घेतलेल्या निर्णयासाठी ‘यशराज फिल्म्स’चे सर्वेसर्वा आदीत्य चोप्रा यांनी सलमानला आग्रह केला अशी माहीती सूत्रांनी दिली आहे. पण ‘यशराज फिल्म्स’ किंवा सलमान खान यांपैकी कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही. अली अब्बास झफ्फर दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित ‘सुलतान’ ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.