चित्रपट अभिनेता सलमान खान याला काळवीट शिकारप्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. कायद्यासमोर सगळे समान असतात. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा असे न्यायप्रक्रियेत चालत नाही, असे खडे बोल सुनावत अभिनेता सलमान खान याला दिलासा देण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले.
न्या. एस. जे. मुखोपाध्याय आणि न्या. पी. सी. पंत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्या वेळी राजस्थान उच्च न्यायालयाच्या निकालास स्थगिती देतानाच पुराव्यांची नव्याने तपासणी करण्यात येईल, असे खंडपीठाने स्पष्ट  केले. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजी होईल, असे स्पष्ट केले.१९९८ मधील काळवीटांच्या शिकारप्रकरणी कनिष्ठ  न्यायालयाने अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवीत दोन भिन्न  प्रकरणांमध्ये एकूण सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मात्र चार वर्षांपेक्षा अधिक कारावासाची शिक्षा ठोठावल्यामुळे सलमान याचा व्हिसा ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाने फेटाळून लावला. त्यामुळे या निर्णयास त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयानेही सलमान खान याला दिलासा दिला, मात्र त्या निर्णयास राजस्थान सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करताना,  सलमानाने मी प्रतिष्ठित नागरिक असून भारताची प्रतिमा चित्रपटांद्वारे उंचावतो तसेच रोजगाराची निर्मितीही करतो, स्पष्ट केले.