बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने अनेकांना धक्का बसला. पण सुशांतने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आलेले नाही. पण त्याच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला. दिग्दर्शक अनुराग कश्यपचा भाऊ अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझे करिअर संपवले अशी धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. पण सलमानच्या चाहत्यांनी सलमानला पाठिंबा दिला असल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मिळून माझे करिअर संपवले अशी धक्कादायक पोस्ट सोशल मीडियावर लिहिली होती. त्याची पोस्ट तुफान व्हायरल झाली. त्यानंतर सलमानचे वडिल सलीम खान यांनी अभिनवला जे करायचे आहे ते करु द्या. त्यावर प्रतिक्रिया देऊन मी माझा वेळ वाया घालवणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर भाऊ अरबाज खानने या विरोधात करवाई केली जाईल असे म्हटले होते.

तसेच दिवंगत अभिनेत्री जिया खानची आई राबिया अमीनने देखील सलमानवर गंभीर आरोप केले. त्यानंतर सोशल मीडियावर सलमानला ट्रोल करण्यात आले होते. पण आता सलमानच्या चाहत्यांनी सलमानला पाठिंबा दिला आहे. ट्विटरवर #WeStandBySalmanKhan हे ट्रेंड होत होतं. जवळपास तीन लाख चाहत्यांनी सलमानला पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील मोठे कलाकार सलमान खान, करण जोहर, संजय लीला भंसाली आणि एकता कपूर यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेशानं वकील असलेल्या सुधीर कुमार ओझा (Sudhir kumar Ojha) यांनी बिहारमधील मुझफरपूर येथील पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.