बॉलिवूडमध्ये सध्या घोंघावत असलेल्या #MeToo च्या वादळावर बरीच मतमतांतरे पाहायला मिळाली. काहींनी या मोहिमेला पाठिंबा दर्शविला तर काहींनी या आरोपांना पब्लिसिटी स्टंटचं नाव दिलं. इतकंच नव्हे तर काही वर्षांपूर्वीचे आरोप आता पुन्हा नव्याने करण्याची गरज काय असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अभिनेता सलमान खानचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

#MeToo मोहिमेबद्दल सलीम खान यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘स्वत:ला वाचवण्यासाठी ते फक्त एकच प्रश्न विचारत आहेत की आरोप करायला इतका उशिर का? पण मी तर म्हणेन की कधीच न बोलण्यापेक्षा उशिरा तरी बोलणं चांगलं आहे. आता तुम्हाला परिणामांची प्रतीक्षा करण्याची गरज नाही, कारण लोकांचा खंबीर पाठिंबा तुम्हाला मिळाला आहे. लोकांची साथ मिळवण्यात तुम्ही यशस्वी ठरला आहात.’

#MeToo : गैरवर्तनाच्या आरोपांनंतर विकी कौशलच्या वडिलांची जाहीर माफी

‘व्यक्ती एकवेळ पर्वतावरून खाली पडूनही उठून उभा राहू शकतो पण स्वत:च्या नजरेतून नाही,’ अशा शब्दांत सलीम खान यांनी चपराक लगावली आहे. #MeToo मोहिमेमुळे अनेक महिला आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडत आहे. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये कलाविश्वातील दिग्गजांची नावंदेखील समोर आली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत आलोक नाथ, साजिद खान, रजत कपूर, कैलाश खेर, अभिजीत भट्टाचार्य, पियूष मिश्रा, विनोद दुआ, श्याम कौशल, विकास बहल, सुभाष घई यांसारख्या कलाकारांवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत.