बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने आजवर सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ, झरीन खान, आयुष शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांना त्यांची सिनेकारकिर्द सावरण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळेच सलमानला बॉलिवूडचा भाईजान असेही म्हटले जाते. परंतु सलमान आज जरी सुपरस्टार असला तरी कधीकाळी त्याला आपली अभिनय कारकिर्द वाचवण्यासाठी चक्क गोविंदाची मदत घ्यावी लागली होती. होय, हे खरं आहे, अभिनेता गोविंदाला केलेल्या त्या एका फोनमुळे सलमान खान सुपरस्टार झाला.

सलमानने ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली होती. त्यानंतर ‘साजन’, ‘हम आपके है कौन’, ‘करन अर्जुन’ यांसारखे एकामागून एक हिट चित्रपट देत सलमान खान बॉलिवूडमधील नवा सुपरस्टार म्हणून उदयाला येत होता. परंतु त्यानंतर त्याच्या अभिनय कारकिर्दीत असे एक वळण आले जेव्हा त्याचे चित्रपट एकामागून एक फ्लॉप होऊ लागले. ‘वीरगती’, ‘मजधार’, ‘दुश्मन दुनिया का’ ‘खामोशी’ यांसारख्या फ्लॉप चित्रपटामुळे सलमानची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली होती. त्यावेळी सलमानला एका सुपरहिट चित्रपटाची गरज होती. आणि हा सुपरहिट चित्रपट सलमानला गोविंदामुळे मिळाला होता.

डेव्हिड धवन आणि गोविंदा हि दिग्दर्शक-अभिनेता जोडी त्याकाळची एक नंबरची लोकप्रिय जोडी होती. त्यामुळे सलमानने मदत मागण्यासाठी गोविंदाला फोन केला. सलमानचा फोन आला त्यावेळी गोविंदा ‘जुडवा’ या आपल्या आगामी चित्रपटात व्यस्त होता. ‘जुडवा’ हा चित्रपट सुरुवातीला गोविंदाला ऑफर केला गेला होता. या चित्रपटाचे चित्रिकरण देखील सुरु झाले होते. परंतु सलमानसाठी गोविंदाने हा चित्रपट सोडला.

सलमानने गोविंदाला फोनवर “तुम्ही ज्या चित्रपटात काम करत आहात तो चित्रपट तुम्ही करू नका. तो चित्रपट मला द्या. त्या चित्रपटाचा दिग्दर्शक सुद्धा मला द्या. कारण मला एका चांगल्या चित्रपटाची खूप गरज आहे.” अशी विनंती केली होती. आणि आश्चर्याची बाब म्हणजे गोविंदाने तो चित्रपट मित्रासाठी सोडला. त्यानंतर ‘जुडवा’ या चित्रपटात सलमान खान झळकला. हा चित्रपट बॉक्सऑफीसवर सुपरहिट ठरला. परिणामी सलमान पुन्हा एकदा बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्यांच्या शर्यतीत झळकू लागला. गोविंदाने बॉलिवूड हंगामा या वेबसाईटसाठी दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला.