सलमान खानवर दहा वर्षांपूर्वीच्या ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला जावा की नाही याचा निर्णय सोमवारी सत्र न्यायालय देणार होते. परंतु पावसामुळे न्यायालयाचा कर्मचारीवर्ग वेळेत पोहोचू न शकल्याचे निमित्त होऊन हा निर्णय पुन्हा एकदा १५ दिवस पुढे ढकलला गेला.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडणाऱ्या सलमानवर निष्काळजी व बेदरकारपणे गाडी चालविल्याप्रकरणी खटला न चालविता सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविण्याचे आदेश वांद्रे महानगरदंडाधिकाऱ्यांनी दिले होते. तसेच त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप गंभीर असल्याने प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग केले होते. परंतु महानगरदंडाधिकाऱ्यांचा हा निर्णय चुकीचा असून दहा वर्षांनंतर आपल्यावर नव्या आरोपाखाली खटला कसा काय चालवला जाऊ शकतो, असा सवाल उपस्थित करीत सलमानने या निर्णयाला सत्र न्यायालयातच आव्हान दिले आहे. सलमानचे अपील आणि खटल्याची एकत्रित सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांच्यापुढे सुरू होती. सुरुवातीला आपण सलमानच्या अपिलावर निर्णय देऊ, असे स्पष्ट करीत न्यायालयाने त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. परंतु पावसाच्या कृपेमुळे न्यायालयाचे कर्मचारी वेळेत न पोहोचल्याने सलमानच्या वकिलांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती न्यायालयाकडे केली. सरकारी पक्षानेही त्याला कुठलाच आक्षेप न घेतल्याने न्यायालयाने ही विनंती मान्य करीत सलमानचा फैसला २४ जून रोजी सुनावला जाईल, असे स्पष्ट केले.