बॉलिवूड अभिनेता सलमान खान पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी अडचणीत सापडला आहे. सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा विरोधात मंगळवारी रात्री उशीरा महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंधेरीच्या न्यायालयात सलमानविरोधात मारहाण आणि दरोड्याची तक्रार दाखल करण्यात आली असून अशोक पांडे यांनी ही तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी  प्राणघातक हल्ला, गुन्हेगारी आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली मात्र गुन्हा नोंदवला जात नसल्यामुळे पांडे यांनी थेट न्यायालयात धाव घेतली. पांड्ये यांचे वकील नीरज गुप्ता आणि निशा आरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान खान आणि बॉडीगार्ड शेराविरोधात भा. दं. वि. 323, 392, 426, 506, आणि 34 या अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. १२ जुलै रोजी या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

सलमान खान डी एन नगर परिसरात सायकल चालवत होता त्यावेळी एका व्यक्ती त्याचा पाठलाग करत व्हिडिओ बनवत होता. त्याचा सलमानला राग आल्यामुळे सलमान आणि त्याच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतला तसेच शिवीगाळ केली असा आरोप करण्यात आला आहे.

अंधेरीच्या डी एन नगर परिसरात बुधवारी संध्याकाळी सलमान खान सायकल चालवत असताना अशोक पांड्ये यांनी त्याचा जवळपास 20 मिनीटे पाठलाग करत व्हिडिओ बनवला. यावेळी सलमानसोबत झालेल्या वादामुळे अशोक पांडे यांनी तक्रार दाखल करून सलमान व त्याच्या अंगरक्षकाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.