मि.परफेक्शनिस्ट आमिर आणि दबंग सलमान हे दोघे खूप चांगले मित्र आहेत, हे त्यांच्या चाहत्यांना माहितच असेल. मात्र, तरीही ही जोडी अंदाज अपना अपना या चित्रपटाव्यतिरीक्त एकत्र दिसली नाही. पण, हे दोघेही एकमेकांच्या चित्रपटांची आणि भूमिकांची प्रशंसा करताना कधीच थकत नाही.
आमिरचा धूम ३ आज (२० डिसेंबर) प्रदर्शित झाला आहे. सलमान त्याच्या बिग बॉ़स या रियलिटी शोमधून गेले काही दिवस धूम ३ची जाहिरात करत होता. मग, आमिर तरी कसा मागे राहिल. एका कार्यक्रमात आमिरने सलमानच्या कामाची प्रशंसा केली. सलमान त्याच्या प्रत्येक चित्रपटाने अधिकाधिक चमकत आहे. त्याचा दबंग चित्रपट मला आवडला होता. पुढील महिन्यात त्याचा जय हो प्रदर्शित होणार असून, तो पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे आमिरने सांगितले.
सलमानच्या चित्रपटांची आपण सगळेच उत्सुकतेने वाट पाहतो आणि तुम्हा सर्वांप्रमाणेच मीसुद्धा त्याचा चाहता आहे. मी अजून जय होचा प्रोमो बघितलेला नाही. पण, मी आज तो बघेन, असे आमिर म्हणाला. यावेळी आमिरने बिग बॉसमधून धूम ३ची प्रसिद्धी करण्याकरिताही सलमानचे आभार मानले. तो म्हणाला की, हे त्याचे प्रेम आहे. त्याच्यासाठी मीसु्द्धा काहीतरी करु शकेन अशी मला अपेक्षा आहे.