‘देश लोगों से बनता है और पहचान उनके परिवार से, अशा दमदार संवादाने सजलेला ‘भारत’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर प्रचंड चर्चेचा विषय ठरला होता. अखेर तो सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘भारत’ ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टपैकी एकामध्ये सलमान खान ७० वर्षीय वयोवृद्धाच्या भूमिकेत दिसून आला होता. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये सलमानला तारुण्यावस्थेत पाहायला मिळालं होतं. या पोस्टरनंतर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ठरलेला ट्रेलर सोमवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रदर्शित झालेला ट्रेलर तीन मिनीट ११ सेकंदांचा असून या ट्रेलरमध्ये भारतचा(सलमान खान) आयुष्यातील काही घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यासोबतच या ट्रेलरमध्ये सलमानसोबत जॅकी श्रॉफ, कतरिना कैफ, सुनील ग्रोवर,दिशा पटानी, नोरा फतेही हे कलाकारदेखील झळकले आहेत. या चित्रपटामध्ये सलमानने तारुण्यावस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत अनेक रुपं साकारली आहेत. त्यामुळे सलमान पहिल्यांदाच पाच वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दमदार संवाद, अॅक्शन सीन आणि भूतकाळावर प्रकाश टाकणाऱ्या काही घटना या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आल्यामुळे कमी कालावधीत तो प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या चित्रपटामध्ये सलमान कतरिनाला ‘मॅडम सर’ या विशेष नावाने संबोधत असल्याचं पाहायला मिळतंय. तर जॅकी श्रॉफ यांनी सलमानच्या वडीलांची भूमिका वठविली आहे.

दरम्यान, हा चित्रपट ईदला म्हणजेच ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर ‘भारत’ आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत.