सलमान खान आणि कतरिना कैफ स्टारर ‘टायगर जिंदा है’ सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ३२८.०९ कोटी रुपयांचा पल्ला पार केला. अॅक्शनपॅक्ट अशा या सिनेमातला क्लायमॅक्स सीन अनेकांनाच फार आवडला. पण पडद्यावर जेवढा हा सीन रोमांचक दिसतो तेवढाच तो चित्रीत करणं खूप कठीण होतं. नुकताच या क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तेलाच्या टँकरद्वारे रुग्णालयात स्फोट घडवण्यात येतो. हा सीन मोठ्या पडद्यावर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, तो चित्रीत करणं किती कठीण गेलं असेल.

अबू धाबीमध्ये हा सीन चित्रीत करण्यात आला होता. हॉलिवूडच्या अॅक्शन डिरेक्टरने हा सीन डिरेक्ट केला आहे. स्फोट घडवून आणणाऱ्या टँकरला स्टंटमन सॅम ट्रिमिंगने चालवले. टँकर चालवतानाचा अनुभव सांगताना सॅम म्हणाला की, ‘पहिल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या दोन कॅनलमध्ये उच्च दाबाचा गॅस भरण्यात आला होता. या सीनच्या चित्रीकरणादरम्यान माझ्या सुरक्षेची योग्य काळजी घेण्यात आली होती.’

या सीनचे चित्रीकरण झाल्यानंतर संपूर्ण टीम एकच जल्लोष करते. तर सॅमही त्याला हा स्टंट करु दिल्याबद्दल टायगर जिंदा हैच्या टीमचे आभार मानताना दिसतो. हा सीन ज्यापद्धतीने चित्रीत केला ते पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. तुम्हीही हा सीन एकदा पाहा आणि या सीनसाठी घेण्यात आलेली मेहनत पाहा.

सलमानच्या ‘सुलतान’ या सिनेमाच्या तीन आठवड्यांच्या कमाईचा रेकॉर्ड ‘टायगर जिंदा है’ सिनेमाने केव्हाच मोडला. गेल्या वर्षी ‘ट्युबलाइट’ या सिनेमाने मात्र अपेक्षेप्रमाणे कमाई केली नव्हती. त्यामुळे सलमानसोबत प्रेक्षकांचीही निराशा झालेली. पण यावर्षी ‘टायगर जिंदा है’ने घेतलेली झेप ही विशेष महत्त्वपूर्ण ठरली.