बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा टायगर जिंदा है हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. वर्षा अखेरीस सलमान आपल्या चाहत्यांना एका चांगल्या सिनेमाची भेट देऊ इच्छित असावा. या सिनेमासाठी सलमानने विशेष मेहनत घेतली आहे. त्याने एकाहून एक सरस असे स्टंट्स स्वतःहून करण्याला प्राधान्य दिले आहे. एकीकडे स्टंट्स करताना तो बर्फाळ प्रदेशात कोल्ह्यासोबत दोन हात करताना दिसतो. नुकताच या सिनेमाशी निगडीत एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि काही काळातच तो झपाट्याने व्हायरलही झाला. या फोटोमध्ये सलमान कोल्ह्याच्या समोर उभा असलेला दिसत आहे.

अब्बास अली जफर दिग्दर्शित या सिनेमाचे काही सीन हॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक टॉम स्ट्रूथर्सने कोरिओग्राफ केले आहेत. सिनेमाशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘या सिनेमासाठी सलमान एक पाऊल पुढे गेला आहे. या सिनेमात सलमान कोल्ह्यासोबत दोन हात करताना दिसत आहे. सलमानचा हा सीन प्रेक्षकांनी आतापर्यंत पाहिलेलाच नसेल. हा सीन ऑस्ट्रियाच्या एका बर्फाळ भागात चित्रीत करण्यात आला आहे.’

https://www.instagram.com/p/BcoTwRMFaQX/

या सीनचे चित्रीकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टीमची मदत घेण्यात आली होती. सिनेमाच्या महत्त्वपूर्ण भागापैकी हा एक भाग आहे. आतापर्यंत कोणत्याही बॉलिवूड सिनेमात अशा पद्धतीचे चित्रीकरण करण्यात आलेलं नसावं अशाच पद्धतीने हा सीन चित्रीत करण्यात आला आहे.