केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे तेथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. यामध्ये अनेकांचे जीव गेले असून असंख्य लोक बेघर झाले आहेत. जगभरातून केरळसाठी मदतीचा ओघ सुरु असतानाच अभिनेता सलमान खान याने १२ कोटी रुपयांची आर्थिक मदत केल्याचं समोर आलं आहे. मात्र चुकीची माहिती पसरविल्यामुळे अभिनेता जावेद जाफरी चांगलाच ट्रोल झाला आहे.

केरळवर ओढावलेल्या या नैसर्गिक संकटामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. त्यामुळे त्यांची विस्कटलेली घडी नीट बसविण्यासाठी सर्व स्तरामधून शक्य तेवढी मदत करण्यात येत आहे. त्यामुळेच अभिनेता सलमान खाननेही १२ कोटी रुपयांची मदत केल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सलमानने ही मदत केल्यामुळे जावेदने त्याचं अभिनंदनही केलं होतं. मात्र, सलमानने अशी कोणतीच मदत न केल्यामुळे जावेदला ट्रोल व्हावं लागलं आहे.

जावेदने कोणत्याही पुराव्याशिवाय सलमानने केरळवासियांना मदत केल्याचं म्हटलं होतं. मात्र याविषयी पुरावा काय असा प्रश्न जावेदला विचारण्यात आल्यानंतर त्याने ट्विट डिलीट करण्याचा निर्णय घेतला. ‘जोपर्यंत पूर्ण आणि खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत मी माझं ट्विट मागे घेतो’, असंही जावेदने स्पष्ट केलं.

जावेदने केलेल्या ट्विटमध्ये त्याने सलमानचं कौतुक केलं होतं.तसंच तो अडचणीत सापडलेल्यांना कायम मदतीचा हात पुढे करत असतो असं म्हटलं होतं. मात्र सलमानने खरंच ही मदत केल्याचा पुरावा काय असा प्रश्न एका नेटकऱ्याने जावेदकडे मागितला. तसंच केरळला आतापर्यंत कोणीकोणी मदत केली याची यादीही नेटकऱ्यांनी शेअर केली. मात्र या यादीमध्ये सलमानचं नाव कुठेच नव्हतं. मग सलमानने केलेली मदत खरी आहे. याचा पुरावा काय असा प्रश्न जावेदला विचारणात आला होता.

दरम्यान, सलमान सध्या माल्टामध्ये ‘भारत’ चित्रपटाचं चित्रिकरणात व्यस्त असून त्याने स्वत:देखील केरळवासीयांना केलेल्या मदतीविषयी कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.