भारताची स्टार महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर आहे. मीराबाई चानू ही सलमान खानची मोठी फॅन आहे. अनेकदा तिने दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं. हे सलमान खानला जेव्हा हे कळलं त्यानंतर त्याने मीराबाई चानूची भेट घेतली. अभिनेता सलमान खानने या भेटीचा एक फोटो देखील शेअर केलाय.

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा फोटो शेअर केलाय. सिल्वर मेडलिस्ट मीराबाई चानू आपली फॅन आहे हे कळताच त्याने तिची भेट घेण्याचं ठरवलं. अनेक दिवसांपासून सलमानला भेटण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. आपल्या आवडत्या कलाकाराची भेट घेतल्यानंतरचा आनंद मीराबाई चानूच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. या फोटोमध्ये सलमानच्या गळ्यात एक शॉल दिसून येतेय. सिल्वर मेडलिस्ट मीराबाईने तिच्याकडून आपल्या आवडत्या कलाकाराली ही भेट दिलेली दिसून येतेय. अभिनेता सलमान खानने या भेटीचा फोटो शेअर करत एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय, “रौप्यपदक मिळवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन…मीराबाई चानूसोबतची प्रेमळ भेट…खूप खूप शभेच्छा तुला.”

भारताच्या वेटलिफ्टर मिराबाई चानू यांनी टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये पहिल्याच दिवशी भारतासाठी पदककमाई केली. त्यांनी महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण होता. या क्षण प्रत्येक भारतीयाने साजरा केला. त्यानंतर तिने दिलेल्या अनेक मुलाखतीत बोलताना ती सलमान खानची मोठी फॅन असल्याचं सांगितलं होतं. “सलमान मला खूप आवडतो, त्याचं बॉडी स्ट्रक्चर मला खूप आवडतं”, असं ती म्हणाली होती. त्यानंतर सलमान खानने तिचं ट्विटरच्या माध्यमातून अभिनंदन देखील केलं होतं. ट्विटरवर तिचं अभिनंदन करताना सलमानने लिहिलं होतं की, “आज देशाची सुपरस्टार बनल्याबद्दल मीराबाई चानूचं खूप खूप अभिनंदन…आपण आम्हाला अभिमानास्पद केले आहे. आपण तर खऱ्या दबंग आहात.”

 

अभिनेता सलमान खानसह बॉलिवूडमधील इतर सेलिब्रिटींनी सुद्धा तिचं अभिनंदन केलं होतं. कंगना रनौत, फरहान अख्तर, अभिषेक बच्चन आणि जान्हवी कपूर सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत मिराबाई चानू यांचा ऐतिहासिक विजय साजरा केला.

मिराबाईची वेटलिफ्टिंगमध्ये कारकीर्द घडावी, म्हणून पाच वर्षांपूर्वी तिच्या आईने आपले दागिने विकले होते. त्यामुळे तिचं हे यश पाहून आई सैखोम ओंगबी टोंबी लेईमाला आपले अश्रू आवरणे कठीण गेले होते.