बॉलीवूडचा भाईजान म्हणजे सलमान खानने त्याची कमिटमेंट पूर्ण केली आहे. सलमान खानचा आगामी सिनेमा ‘राधे’ 13 मे ला रिलीज होतोय. करोनाच्या संकटामुळे हा सिनेमा भारतात चित्रपटगृहात प्रदर्शित न होता विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलिज होणार आहे. नुकत्याच झालेल्या एका बेबीनारमध्ये सलमान खानने सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा केलाय. यात सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होत नसल्यानं मोठं नुकसान सहन करावं लागणार असलं तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ‘राधे’ ईदला रिलीज करत असल्याचं तो म्हणाला.

राधेच्या प्रदर्शावर बोलताना सलमान म्हणाला, ” येत्या काळात करोना संपल्यानंतर लवकरच हा सिनेमा पुन्हा एकदा चाहत्यांसाठी सिनेमागृहात रिलीज करणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत ते शक्य नाही. आम्हाला वाटलं होतं सर्व काही सुरळीत होईल. मात्र आम्ही जशी तारीख जाहीर केली. तसा हा करोना पुन्हा आला. मात्र आम्हाला कितीही नुकसान झालं तरी आम्ही प्रेक्षकांसाठी सिनेमा रिलीज करण्याचं ठरवंल. नेहमी आम्ही 200 कोटी, 300 कोटी असा गल्ला करतो. यावेळी पूर्ण तोटा होणार आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही तोटा सहन करू. ” असं सलमान म्हणाला.

पुढे सलमान म्हणाला, “सध्याचा काळ कठीण आहे. अनेकांचे रोजगारही गेले आहेत. अशात पैसे खर्च करून सिनेमा पाहायला जाणं अनेकांना असंही शक्य नाही. त्यामुळे घरबसल्या अगदी कमी खर्चात अनेक जण कुटुंबासोबत हा सिनेमा पाहू शकतात.”

मायकल जॅक्सन आणि प्रभुदेवाला नक्कीच मागे टाकेन.

राधे सिनेमातील अनेक गाणी या आधीच रिलीज झाली असून या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. दमदार गाणी आणि सलमानच्या डान्सची हटके स्टाईल सध्या चर्चेत आहे. सलमानच्या डान्सची अल्लू अर्जुनसोबत तुलना केली जात असल्याच्या प्रश्नावर सलमानने मजेशीर उत्तर दिलंय. “मला माझ्या डान्सबद्दल चांगलं माहिते. आता तर ही सुरुवात आहे. आणखी 30-40 वर्षात मी मायकल जॅक्सन आणि प्रभुदेवाला नक्कीच मागे टाकेन. अजून तीस चाळीस वर्ष मला नाचायचंय.” असं धमाल उत्तर सलमानने दिलं.


या ओटीटीवर पाहता येईल ‘राधे’

13 मे ला विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर सलमान खानचा ‘राधे ‘ सिनेमा रिलीज होतोय. हा सिनेमा झी5, झी प्लेक्स, डिश टीव्ही, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्हीवर रिलीज होणार आहे. ‘पे पर व्हू’ या फॉरमॅटमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. म्हणजेच प्रत्येकवेळी हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. मात्र एखदा सिनेमा पाहण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.