कसं काय मंडळी, बरं हाय ना? हसताय ना? असा आपुलकीचा प्रश्न विचारणारा दिग्दर्शक आणि सुत्रसंचालक निलेश साबळे याचा प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱया ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची महाराष्ट्रात सध्या जोरदार ‘हवा’ आहे. ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम आता केवळ मराठी सिनेमांचे प्रमोशन करण्याचे व्यासपीठ राहिलेला नसून, बॉलीवूडचे सेलिब्रिटी देखील आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर उपस्थित राहत आहेत. शाहरुख, विद्या बालन यांच्या उपस्थितीनंतर आता बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या ‘सुलतान’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर उपस्थित राहणार असल्याचे समजते. येत्या बुधवारी गोरेगावच्या फिल्मसीटीमध्ये या कार्यक्रमाचे चित्रीकरण होणार असून, हा एपिसोड पुढील आठवड्यात टेलिव्हिजनवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.